गिरणी कामगारांना घरांचा ताबा घेण्यास ४५ दिवसांची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 08:27 IST2026-05-18T08:27:10+5:302026-05-18T08:27:22+5:30
गृहनिर्माण विभागाचा म्हाडा प्रशासनाला आदेश

गिरणी कामगारांना घरांचा ताबा घेण्यास ४५ दिवसांची मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ठाणे व रायगड जिल्ह्यांतील २,४१७ घरांसंदर्भात गृहनिर्माण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार गिरणी कामगारांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी शासनाने म्हाडाला ४५ दिवसांत कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
सर्व निकष पूर्ण करूनही अद्याप घरांचा ताबा घेतलेला नाही, अशा लाभार्थी गिरणी कामगारांना प्राधान्याने ताबा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रतीक्षा यादीतील पात्र गिरणी कामगारांनाही घर वाटपाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी १३ मार्च रोजी गृहनिर्माण विभागाच्या गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांवर मंत्रालयात बैठक झाली होती. यावेळी एनटीसीच्या जागांवर घरबांधणी, एमएमआरडीएमार्फत उपलब्ध घरे, बंद पडलेल्या मिल जागांचा वापर, तसेच विविध पुनर्वसन प्रकल्पांमधून गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आले.
गिरणी कामगारांसाठी आवश्यक त्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. उपलब्ध जागांचा सर्वंकष अभ्यास करून जास्तीत जास्त घरे गिरणी कामगारांना द्यावीत, असेही शासनाने बैठकीत स्पष्ट केले.
यामुळे कामगारांच्या आतापर्यंतच्या संघर्षाला यश येत असून, शासन स्तरावर हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्षात घरांचे वाटप आणि ताबा प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी, असे गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेने सांगितले.