राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 14:36 IST2025-07-05T14:35:30+5:302025-07-05T14:36:55+5:30
तब्बल २० वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. या सभेला मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता.

राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
तब्बल २० वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. या सभेला मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. या पार्श्वभूमीवर भाषण करताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या विजयी सभेतून जोरदार टोलेबाजी केली. कार्यक्रमाच्या अखेरिस उपस्थित असलेल्या मान्यवरांना मंचावर बोलावण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील मंचावर उपस्थित होत्या.
दोन्ही नेत्यांची भाषणं संपल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असेल्या सर्वपक्षीय नेत्यांना मंचावर बोलावण्यात आलं. यावेळी सर्वांसोबत मनसे नेते अमित ठाकरे आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेत अमित ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आणि आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे यांच्या बाजूला उभं केलं. यादरम्यान, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला.
उत्तम फॅमिली फोटो दिसला
कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रातील सर्व बड्या नेतेमंडळींना मंचावर बोलावले. त्यांचे आभार मानले आणि त्यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यानंतर राज आणि उद्धव यांचे कुटुंबीय देखील एकाच व्यासपीठावर आले आणि एक उत्तम फॅमिली फोटो दिसला. राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरे सर्वांनी एकत्रित उभे राहून फॅमिली फोटोसाठी पोज दिली.