आंब्यांवर ताव, आता लोणच्याची घाई; कैऱ्यांचा भाव काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:33 IST2026-05-19T10:33:09+5:302026-05-19T10:33:40+5:30
मे महिना सुरू होताच लोणचे बनविण्याची तयारी सुरू आहे. कैऱ्या धुणे, वाळविणे, मसाले तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग वाढली आहे. आजही अनेक कुटुंबांत वर्षभरासाठीचे लोणचे घरीच बनविले जाते.

आंब्यांवर ताव, आता लोणच्याची घाई; कैऱ्यांचा भाव काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बाजारपेठेत रसाळ आंबा दाखल झाला असतानाच आता गृहिणींची पावले लोणच्यासाठीच्या गावरान कैऱ्यांकडे वळू लागली आहेत. शहरातील भाजीमंडई, मार्केट यार्ड आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात कैऱ्यांची आवक सुरू झाली असून, घरी आंबा लोणचे बनविण्याला मोठी पसंती दिसत आहे. यंदा बाजारात आंब्यांची आवक समाधानकारक आहे. हापूस, केशर, रायवळ यांसह स्थानिक जातींचे आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. किरकोळ बाजारात साधारण दर्जानुसार ८० ते २५० रुपये डझन दराने आंब्यांची विक्री सुरू आहे.
मे महिना सुरू होताच लोणचे बनविण्याची तयारी सुरू आहे. कैऱ्या धुणे, वाळविणे, मसाले तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग वाढली आहे. आजही अनेक कुटुंबांत वर्षभरासाठीचे लोणचे घरीच बनविले जाते.
कैऱ्या फोडणारे सापडेना...
पूर्वी कैऱ्या फोडून देणारे कारागीर सहज उपलब्ध व्हायचे; मात्र आता दुर्मीळ झाले आहेत. काही ठिकाणी मशीनद्वारे कैऱ्या फोडण्याची सुविधा असली तरी अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
रेडिमेड लोणच्यात ॲसिड, प्रिझर्व्हेटिव्ह्ज
अनेक रेडिमेड लोणच्यांमध्ये टिकवण क्षमता वाढविण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह्ज, कृत्रिम रंग आणि ॲसिडचा वापर केला जातो. खाद्यतज्ज्ञांच्या मते, यामुळे चव टिकली तरी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.
घरचे लोणचे कशामुळे मानले जाते चांगले?
घरच्या लोणच्यात वापरलेले तेल, मसाले, मिठाचे प्रमाण चवीनुसार असून कृत्रिम रंग, रसायनांचा वापर टाळला जातो. स्वच्छतेची काळजी घेतल्याने लोणचे पौष्टिक, चविष्ट ठरत पारंपरिक पाककृतींने चवही टिकून राहते.
घट्ट गर, कच्च्या कैऱ्यांना मागणी : सध्या बाजारात घाऊक बाजारात कैऱ्यांचे दर प्रतिकिलो ३० ते ५० रुपये असून, किरकोळ बाजारात ६० ते ९० रुपये किलोपर्यंत विक्री होत आहे. दर्जा, आकार आणि आवक यानुसार भावात चढ-उतार दिसत आहेत. लोणच्यासाठी तंतूमुक्त, लहान गर, जाड डागविरहित आणि अति न पिकलेली कैरी निवडली जाते.