महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 05:35 IST2026-04-26T05:35:11+5:302026-04-26T05:35:38+5:30
निवडणुकीत उतरलेल्या अनेक उमेदवारांसाठी त्यांचे सहकारी डॉक्टर समाज माध्यमांवर प्रचार करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
मुंबई - वैद्यकीय वर्तुळात प्रतिष्ठित असणाऱ्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलसाठी राज्यभरात रविवारी मतदान होणार आहे. कौन्सिलच्या नऊ जागांसाठी सुमारे ६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यात सरासरी एका ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदान पार पडेल. मतांची मोजणी बुधवारी परळ येथील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन संस्था येथे सकाळपासून सुरू होणार आहे.
यावेळी प्रथमच डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नावाने नऊ उमेदवारांची तीन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यासोबत अन्य काही पॅनल असून, काही वैयक्तिक डॉक्टर सुद्धा उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले आहेत. १ लाख ४० हजार नोंदणीकृत मतदार आहेत. त्यामुळे या संघटनेत उभी फूट पडली असल्याची चर्चा डॉक्टरांमध्ये आहे. त्यामुळे अनेक मतदार संभ्रमात असल्याचे दिसत आहे. निवडणुकीत उतरलेल्या अनेक उमेदवारांसाठी त्यांचे सहकारी डॉक्टर समाज माध्यमांवर प्रचार करताना दिसत आहेत.
राजकीय मदत
काही पॅनलच्या उमेदवारांकडून राजकीय मदत घेतली जात आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी थेट प्रचारात उतरले नसले तरी त्यांच्या पद्धतीने ते नियोजन करत आहेत. त्यामुळे यंदाची डॉक्टरांची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही प्रमाणात पत्रके काढून एकमेकांवर आरोपाच्या फैरीदेखील झडताना पाहायला मिळत आहेत. मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची सोयसुद्धा केल्याचे बोलले जात आहे.