Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 15:41 IST

Maharashtra News : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असणारे आघाडीचे मित्रपक्ष शिवसेनेसोबत जाण्यास नाराजी असल्याचे सांगण्यात येत होते.

मुंबई: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती शासन लागू झाल्यापासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपाकडून अडीच- अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु केली होती. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असणारे आघाडीचे मित्रपक्ष शिवसेनेसोबत जाण्यास नाराजी असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मित्रपक्षांसोबत बैठक घेऊन त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या नंतर शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास मित्रपक्षांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांना विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी आम्ही आज बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यास असल्याचे त्यांनी सांगितले असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याचं निश्चित मानलं जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मॅरेथॉन बैठका सुरू असून, ते लवकरच शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करतील, अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक बोलावली होती. शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवरील बैठक संपली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

१५, १५, १३ चा प्रस्ताव!

महाराष्ट्रात शिवसेनेसह कशा प्रकारे सरकार स्थापन करावे, याबाबतचा फॉर्म्युला काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी तयार केला असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची शुक्रवारी मुंबईत शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा होणार असून, त्यानंतर सरकार स्थापनेची तिघांतर्फे अधिकृत घोषणा होईल, असे समजते. शरद पवार मुंबईत परतताच रात्री उशिरा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पवार यांच्याशी निवासस्थानी सविस्तर चर्चा केली.

काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जो फॉर्म्युला तयार झाला आहे, त्यात दोन प्रस्ताव असून, ते शिवसेनेसमोर ठेवण्यात येणार आहेत. एका फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या वाट्याला प्रत्येकी उपमुख्यमंत्रिपदासह अनुक्रमे १५ व १३ मंत्रिपदे येतील. दुसऱ्या प्रस्तावात शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि तिन्ही पक्षांचे प्रत्येकी १४ मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसशिवसेनाउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019