Join us  

संजय राऊत यांचा पुन्हा भाजपावर निशाणा; ट्विटरवरुन केलं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 8:48 AM

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. 'रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी………!' असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.संजय राऊत यांनी वन्स अपॉन टाईम इन मुंबई या हिंदी चित्रपटातील एक संवाद ट्विट केला आहे.

मुंबई - महायुतीला सत्तेसाठीचा जनादेश मिळालेला असतानाही सत्ता स्थापन करण्यास शिवसेना इच्छुक नसल्याने आम्ही सध्या सरकार स्थापन करू शकत नाही, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भाजपाने सांगितले. त्यामुळे आता राज्यपालांनी, सरकार स्थापन करण्यास तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा शिवसेनेला केली आहे. शिवसेनेची मदार आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर असेल. हे दोन पक्ष काय भूमिका घेतात, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. 'रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी………!' असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला लक्ष्य करत आहेत. संजय राऊत यांनी सोमवारी (11 नोव्हेंबर) वन्स अपॉन टाईम इन मुंबई या हिंदी चित्रपटातील एक संवाद ट्विट केला आहे. 'रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी………!' असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचे सुतोवाच दिले आहेत. राऊत आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट घेतील. या भेटीनंतर राज्यातील नवीन समीकरण उदयास येऊ शकतं. 

शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत आज मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का राहायचे? असा सवाल त्यांनी केला आहे. 

तसेच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी 11 वाजता दिल्ली येथे मी पत्रकार परिषद घेणार आहे अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्यातील सत्तास्थापनेसाठी महाराष्ट्रात महाशिवआघाडी असं नवीन समीकरण पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना राज्यात सत्तास्थापन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

रविवारी उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांची बैठक घेतली होती. त्यात आमदारांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी तुमचा आणि पक्षाचा फायदा होईल, असा निर्णय घेईन. युतीमध्ये शिवसेनेचे नेहमीच नुकसान झाले. फायद्याच्या वेळी भाजपने आपल्याशी चांगले संबंध ठेवले आणि गरज नाही, तेव्हा आपल्याला अपमानित केले. अहंकारी मित्रच आज आपल्याशी शत्रूसारखे वागत आहे. अशा वेळी आपण काय करायचे? त्यांना वठणीवर आणायचे असेल, तर पर्यायाचा विचार करावाच लागेल. कालपर्यंत आम्ही पालखीचे भोई होतो, आता आम्हाला या पालखीत मुख्यमंत्री म्हणून शिवसैनिकालाच बसवायचे आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला होता. त्यामुळे शिवसेना राज्यात सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019संजय राऊतशिवसेनाभाजपाउद्धव ठाकरेअरविंद सावंतराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस