नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 19:45 IST2024-10-26T19:43:47+5:302024-10-26T19:45:58+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी घेतली नवाब मलिकांची भेट

नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांच्या उमेदवारीवरून महायुतीत भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद आहेत. नवाब मलिकांचं काम आम्ही करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळांनी नवाब मलिकांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवाजीनगर मानखुर्दची जागा मी लढणार असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी म्हटलं की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादांची भेट झाली आहे. सविस्तर चर्चा झाली आहे. मी शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परंतु ते अपक्ष लढणार आहेत की राष्ट्रवादीच्या तिकिटावर या प्रश्नावर उत्तर देणे नवाब मलिकांनी टाळलं. नवाब मलिकांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र नवाब मलिकांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून भाजपाने विरोध केला आहे. २९ ऑक्टोबरला नवाब मलिक निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत त्यामुळे मलिकांच्या उमेदवारीवर भाजपा काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.
नवाब मलिकांना भाजपाचा विरोध का?
ठाकरे सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री नवाब मलिक आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. त्यात भाजपने नवाब मलिकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे मलिकांना तुरुंगातही जावे लागले होते. अजितदादा यांनी शिंदे सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तुरुंगातून सुटलेल्या मलिक यांनी दादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून त्यांची नाराजी उघड बोलून दाखवली होती. आता नवाब मलिक हे मानखुर्दमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीतही त्यांचे नाव नाही. मात्र, शुक्रवारी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये मलिकांच्या मुलीला अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
आशिष शेलार काय म्हणाले होते?
दाऊदशी संबंधित असलेल्या नवाब मलिक यांचे काम भाजपा कार्यकर्ते करणार नाहीत. आमची भूमिका ठाम आहे असं विधान भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले होते.