Madha Lok Sabha : पवारांचा वार, फडणवीसांचा पलटवार; माढ्याचा तिढा सुटणार, मोहिते पाटील 'सागर' बंगल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 04:14 PM2024-03-28T16:14:13+5:302024-03-28T16:18:50+5:30

Madha Lok Sabha Election 2024 : माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख काही वेळापूर्वी सागर बंगल्यावर आले आहेत.

Madha Loksabha Election 2024 MLA Ranjit Singh Mohite Patil met Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Madha Lok Sabha : पवारांचा वार, फडणवीसांचा पलटवार; माढ्याचा तिढा सुटणार, मोहिते पाटील 'सागर' बंगल्यावर

Madha Lok Sabha : पवारांचा वार, फडणवीसांचा पलटवार; माढ्याचा तिढा सुटणार, मोहिते पाटील 'सागर' बंगल्यावर

Madha Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली. यामुळे अकलूजच्या मोहिते पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली. तर काल जयसिंह मोहिते पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याचे सांगितले. यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या, दुसरीकडे एका लग्नसमारंभात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली, या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. धैर्यशील मोहिते पाटील 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षातून खासदारकी लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता माढ्यातील तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

माढ्याचा तिढा देवेंद्र फडणवीस सोडवणार

माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख काही वेळापूर्वी सागर बंगल्यावर आले आहेत. या भेटील फडणवीस मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. 

कालपासून लोकसभेच्या अडचणीतील जागा सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माढ्यात सगळेच दिग्गज एकमेकांच्या विरोधात उतरले आहेत. 

रामराजे नाईक निंबाळकर देवगिरी बंगल्यावर 

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनीही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला उघड विरोध केला होता. यामुळे आता रामराजे नाईक निंबाळकर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर आले आहेत. या दोन नेत्यांमध्ये माढा लोकसभेसाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांची भेट

पुण्यातील कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्नसोहळा बुधवारी पार पडला. या लग्नसोहळ्याला राजकीय वर्तुळातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यावेळी शरद पवार, संजय राऊत, हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील शेजारी बसलेले होते. या सोहळ्यात शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात चर्चा होत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे शरद पवारांनीच करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. जयसिंह मोहिते पाटलांच्या विधानाला आजची भेटही तितकीच कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी अकलूजमध्ये जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती.

जयसिंह मोहिते पाटील काय म्हणाले?

"मी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी असं चार महिन्यापूर्वीच म्हटले होतं. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत.आम्ही काल त्यांना सांगितलं की, तुम्ही तुमच्या पक्षात रहा. आता आम्ही सर्वांनी शरद पवार यांच्या पक्षात जायचं ठरवलं आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आम्ही जनमत घेतलं, असंही जयसिंह मोहिते पाटील म्हणाले. 

Web Title: Madha Loksabha Election 2024 MLA Ranjit Singh Mohite Patil met Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.