भाजपा म्हणजे xxxx जनता पक्ष, संतप्त उद्धव ठाकरेंकडून शिवराळ भाषेत टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 20:32 IST2024-03-10T20:28:31+5:302024-03-10T20:32:46+5:30
Lok Sabha Election 2024: गेल्या काही दिवसांपासून भाजपावर घणाघाती टीका करत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या सभेमध्ये भाजपावर शिवराळ भाषेत बोचरी टीका केली.

भाजपा म्हणजे xxxx जनता पक्ष, संतप्त उद्धव ठाकरेंकडून शिवराळ भाषेत टीका
लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाकयुद्ध अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपावर घणाघाती टीका करत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या सभेमध्ये भाजपावर शिवराळ भाषेत बोचरी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाचा उल्लेख भाXXX जनता पक्ष असा केला.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही लोकांनी मेहनतीने शिवसेनेचा किल्ला अभेद्य ठेवला आहे. मुळामध्ये प्रश्न आहे की शिवसेना म्हणजे नेमकं आहे काय? जो काही आता भाXXX जनता पक्ष आहे. हो मी बीजेपीला भाXXX जनता पक्षच म्हणतोय. कारण यांच्यामध्ये कोणीही नेता उरलेला नाही. विचार नाही. कुणी आदर्श नाही, म्हणून यांनी अशोक चव्हाणांना घेतलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
किती वर्ष झाली, आणीबाणीनंतर हा पक्ष जन्माला आला. त्याआधी जनसंघ होता. संघाला पुढच्या वर्षी १०० वर्षे होत आहेत. पण १०० वर्ष नुसती भाकड. नुसती शिबिरं झाली. मंथन शिबीर, हे शिबीर, ते शिबीर, पण काहीच निर्माण करू शकले नाहीत. म्हणून त्यांना वरपासून खालपर्यंत बाहेरच्या पक्षातील लोकं आयात करावी लागतात, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
भाजपात बाहेरून होत असलेल्या इनकमिंगवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जय श्री राम ठीक आहे. पण आत भाजपावाले जय आयाराम म्हणायला लागले आहेत. सगळ्या आयारामांची मंदिरं बांधताहेत. सगळे आयाराम, कारण मुळात हृदयामध्येच राम नाही आहे, अशी टीकाही त्यांनी केली.