...तर रुग्णांना खांद्यावरून थेट स्मशानात न्यायचे का?; वरळीत रस्ता अरुंदीकरणाला स्थानिकांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 10:19 IST2026-04-26T10:17:21+5:302026-04-26T10:19:19+5:30
वरळीच्या मोहन पाटील मार्गाच्या अरुंदीकरणाला नागरिकांचा विरोध

...तर रुग्णांना खांद्यावरून थेट स्मशानात न्यायचे का?; वरळीत रस्ता अरुंदीकरणाला स्थानिकांचा विरोध
महेश पवार
मुंबई : वरळीच्या ससमिरा मार्गावरील जुने व प्रसिद्ध असलेले बाणेश्वर मंदिर, काही अंतरावरील सिंधी कॉलनी ते पुढे अमरनगरपर्यंत अरुंद रस्ता. दोन्ही बाजूंना भिंतीचा विळखा, त्यातही वाहनांची पार्किंग, उरलेल्या जागेत दोन गाड्या समोरासमोर आल्यास होणारी वाहतूक कोंडी. एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे वाहन किंवा रुग्णवाहिकेला आत जाण्यासाठी अग्निदिव्य पार करावे लागेल, अशी येथील परिस्थिती. मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समितीत (शहर) गुरुवारी रस्ता अरुंदीकरणाचा अजब प्रस्ताव आलेल्या मोहन दामोदर पाटील मार्गाची ही अवस्था. आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी कमी करण्याच्या प्रस्तावाला स्थानिकांनी विरोध करत आता रुग्णांना रुग्णालयात न नेता थेट स्मशानातच नेण्याची व्यवस्था पालिकेने केल्याची टीका ‘लोकमत’शी बोलताना केली.
कुणाच्या फायद्यासाठी?
१०० ते १५० चार चाकी वाहने या मार्गावरून ये-जा करतात. येथील सिंधी कॉलनीचा विकास झाला तर मोठा रस्ता होऊ शकतो. मात्र, वरळी डेपोचा काही भाग लागून असल्याने विकासक येत नाही. ३६ टेनामेंटच्या विकासासाठी जागा कमी पडत असल्याने त्यांच्या फायद्यासाठी रस्ता कमी करून अधिक जागा मिळवण्यासाठीच हा निर्णय घेतला असावा, अशी शंका स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.
परिसरातील इमारती
बाणेश्वर मंदिर, नूतन बाणेश्वर मंडळ व्यायामशाळा, सिंधी कॉलनी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, श्री सिद्धी सेवा मंडळ, उषा संध्या बिल्डिंग, सी लिंक व्ह्यू सोसायटी, अमरनगर.
निर्णयाचा फेरविचार करा
पूर्वी मोहन दामोदर पाटील मार्गावर दोन गाड्या सहज येत जात होत्या. मात्र, येथे विकास होत असताना रस्ता मोठा होण्याऐवजी तो कमी होत गेला. कधीकाळी येथे साजरे होणारे सण, दीपावली उत्सव, कबड्डी सामने यावर मर्यादा आल्या. आता तो आणखी कमी होणार असल्याने आता हा रस्ता न राहता त्याची पायवाट होईल. यात राजकारण न आणता आमचा विचार करून या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अरुंदीकरणापेक्षा रस्ताच बंद करा. रहिवाशांना इथे अपघाती नव्हे, तर चांगल्या हेलिकॉप्टरने आणून सोडण्याची व्यवस्था करा. बिल्डिंगच्या विकासाला परवानगी दिल्यावर रोड वाढतात; पण इथे रस्ता कमी करताहेत. कुणा विकासकाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे? हा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिकांना का विचारात घेतले नाही? - राजन गवाणकर, अध्यक्ष, अमरनगर सोसायटी
आलेल्या प्रस्तावावर योग्य अभ्यास करून निर्णय घेतला आहे. राजपत्र व वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करून, वॉर्ड ऑफिसमध्ये नोटीस लावून नियमाप्रमाणे १४ फेब्रुवारीपासून हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या. विरोध करणाऱ्या उद्धवसेनेच्या नगरसेविका पद्मजा चेंबूरकर या प्रभाग समिती अध्यक्ष असूनही त्यांना हे माहीत नव्हते का? वॉर्ड, रस्ते व वाहतूक विभागाचा अभिप्राय येऊन सर्व प्रक्रिया पार पडून प्रस्तावाला मंजुरी दिली. अभ्यास केल्याशिवाय कोणतीही गोष्ट चुकीची करणार नाही. - यामिनी जाधव, अध्यक्ष, स्थापत्य समिती (शहर)
प्रस्ताव मंजूर करण्याआधी रस्त्याची पाहणी करण्याची मागणी बैठकीत केली होती. मात्र, अध्यक्षांनी काही न ऐकता प्रस्ताव मंजूर केला. रस्ता रुंद करण्याऐवजी अरुंद करण्यामागचे कारण काय? उरलेल्या जागेचे काय करणार? रस्त्याचा निर्णय घेण्यापूर्वी जनमत/ जनसुनावणी घ्यावी, अशी आमची मागणी आहे. यासाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. अध्यक्षांवर कुणाचा दबाब असला तरी सदस्यांचा बोलण्याचा हक्क त्यांना हिरावून घेता येणार नाही. - पद्मजा चेंबूरकर, नगरसेविका, वॉर्ड क्र. १९६
पालव मार्ग आमच्या हद्दीत येत असला तरी रस्ते व वाहतूक विभागाकडून अरुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. याबाबत त्या विभागाचे चीफ इंजिनिअर अधिक माहिती देऊ शकतील. - स्वप्नजा क्षीरसागर, सहायक आयुक्त, जी दक्षिण विभाग
प्रस्ताव बनविणारे अधिकारी व तो मंजूर करणाऱ्या अध्यक्षांनी आधी रस्त्याची पाहणी करून स्थानिकांचे म्हणणे जाणून घ्यायला हवे होते. पालिकेकडे असलेला जुना रोडमॅप काढून पाहायला हवा होता. - जगन्नाथ साळवी, विलास वेर्लेकर, स्थानिक रहिवासी