नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:14 PM2024-03-26T16:14:08+5:302024-03-26T16:28:27+5:30

महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही यंदाच्या निवडणुकीत प्रभावीपणे लक्ष देऊन कंबर कसली आहे

Job resignation, Jyoti Mete to contest election from Beed; Announcement after the meeting of shivsangram | नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार

नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार

मुंबई/बीड - लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच, यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना पक्ष एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याने ही लढाई रंगतदार होत आहे. गेल्या ४ वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या पंकजा मुंडेंना भाजपाने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे, पंकजा यांनी समाधान व्यक्त करत प्रचाराचा शुभारंभही केला. दुसरीकडे पंकजा मुंडेंविरुद्ध कोण, असा प्रश्न असतानाच आता ज्योती मेटेंनी निवडणूक लढण्याची घोषणाच केली आहे. 

महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यंदाच्या निवडणुकीत प्रभावीपणे लक्ष देऊन कंबर कसली आहे. बीड लोकसभा मतदारसंघावरही त्यांनी विशेष लक्ष दिले असून काही दिवसांपूर्वीच गतवर्षीचे पराभूत उमेदवार बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करुन घेतला आहे. दुसरीकडे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याशीही शरद पवारांनी तब्बल दीड तास चर्चा केली. ज्योती मेटे यांनी पुण्यातील मोदी बाग इथे शरद पवारांची भेट घेतली असून बीड लोकसभेबाबत पवार आणि मेटे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेना तगडं आव्हान बीडमधून देण्यात येणार असल्याचे दिसून येते. 

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या विनायक मेटेंच्या पत्नी असल्याने ज्योती मेटेंच्या भूमिकेकडे मराठा समाजाचेही लक्ष लागले आहे. त्यातच, ज्योती मेटेंनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला असून आता निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचं म्ह्टलं आहे. शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील चर्चेनंतर ज्योती मेटेंनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. तसेच, कोणत्या पक्षाकडून की अपक्ष, ह्याबाबत आपण लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही अग्रस्थानी असून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी २४ मार्च रोजीच्या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात एक मराठा उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे, बीड लोकसभा मतदारसंघात ज्योती मेटे ह्या उमेदवार असल्यास पंकजा मुंडेंची डोकेदुखी वाढू शकते. कारण, बीड जिल्ह्यात मराठा समाजा मोठ्या प्रमाणात असून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर येथील गणितं बदलू शकतात. त्यातच, जरांगे यांच्यामुळे बीड जिल्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्रस्थानी आहे. 

विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू

दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ भातण बोगद्याच्या साधारण १५० मीटर अगोदर विनायक मेटे यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 

Web Title: Job resignation, Jyoti Mete to contest election from Beed; Announcement after the meeting of shivsangram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.