जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:20 IST2025-07-08T12:18:28+5:302025-07-08T12:20:28+5:30
Atal Setu Suicide News: एका डॉक्टरने अटल सेतूवरून खाडीत उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री घडली. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू
Atal Setu Suicide Attempt: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू पुलावरून एका डॉक्टरने उडी मारल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून, मंगळवारी (८ जुलै) दुपारपर्यंत डॉक्टराचा शोध लागला नाही. एका व्यक्तीने डॉक्टरला पुलावरून खाडीत उडी मारताना बघितले आणि पोलिसांना माहिती दिली. पुलावर कार आणि मोबाईल मिळाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डॉ. ओंकार भागवत कवितके (वय ३२) असे अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ओंकार कवितके हे जे.जे. रुग्णालयात कार्यरत आहेत. ते कळंबोली येथे राहतात.
रात्री अटल सेतूवर कार थांबवली अन् खाडीत उडी मारली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार कवितके यांना अटल सेतूवरून खाडीत उडी मारताना एका व्यक्तीने बघितले. त्याने पोलिसांना याची माहिती दिली. नियंत्रण कक्षाला याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि बीट मार्शल लगेच घटनास्थळी पोहोचले.
मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कार थांबवून ओंकार कवितके यांनी खाडीत उडी मारली. पोलिसांना पुलावर होंडा अमेझ कार आणि एक आयफोन मिळाला. मोबाईलमुळे त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना मदत झाली.
खाडीत शोध सुरू
ओंकार कवितके यांनी उडी मारली असल्याचे समजल्यानंतर ध्रुवतारा बोट, शोध पथकाला पाचारण करण्यात आले. खाडीमध्ये ओंकार कवितके यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेबद्दल काही कळल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
ओंकार कवितके यांचा शोध सुरू असून, त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला, याबद्दलही आता पोलीस तपास करत आहेत.