पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 03:34 AM2019-10-26T03:34:43+5:302019-10-26T06:16:15+5:30

कुटुंब रंगलंय राजकारणात...

Husband MP, wife MLA; Two pairs of brothers in the assembly | पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत

पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत

Next

- यदु जोशी/पोपट पवार

मुंबई : महाराष्ट्राला जसे घराणेशाहीचे राजकारण नवे नाही तशी पै-पाहुण्यांची राजकारणातील एकमेकांची घट्ट वीणही अनोळखीची वाटत नाही. याचा प्रत्ययच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आला आहे. कुठे सख्खे भाऊ, कुठे काका-पुतणे, अनेक ठिकाणी मेहुणे-पाहुणे, तर कुठे बाप-लेकांनी एकाचवेळी विधानसभेत पोहोचत नात्यांचा हा पदर राजकीय आखाड्यातही उलगडल्याने राज्याच्या राजकारणात पै-पाहुण्यांचा मेळा भरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातून बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदे या दोन सावत्र भावांना अटातटीच्या लढतीत गुलाल लागल्याने हे दोघेही विधानसभेत दिसणार आहेत. राष्ट्रवादीकडून माढ्यातून बबनदादा निवडून आले, तर राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले संजयमामा शिंदे यांना करमाळ्यातून अगदी काठावर विजय मिळवता आला. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे हे अकोल्याचे खासदार असून त्यांचे सख्खे भाचे रणधीर सावरकर हे अकोला पूर्व मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने जिंकले. खामगावमधून (जि.बुलडाणा) दुसऱ्यांदा जिंकलेले आकाश फुंडकर यांचे चुलत मामा राजेश एकडे हे बाजूच्या मलकापूर मतदारसंघात काँग्रेसतर्फे विजयी झाले. कोल्हापूर दक्षिणमधील काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार ऋतुराज पाटील हे विधान परिषदेचे सदस्य व माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. काका विधान परिषदेत तर पुतण्या विधानसभेत दिसेल.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे राज्यसभेचे सदस्य असून त्यांचे पुत्र नितेश कणकवलीतून भाजपच्या तिकिटावर जिंकले. पर्यावरण मंत्री रामदास कदम हे विधान परिषदेचे सदस्य असून त्यांचे पुत्र योगेश हे दापोलीतून शिवसेनेतर्फे निवडून आले. चंद्रपूरचे काँग्रेस खासदार सुरेश (बाळू) धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर वरोरामधून जिंकल्या. दुसरीकडे जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे हे मामा-भाचेही विधानसभेच्या प्रांगणात पोहोचले आहेत. जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातून विजयाची सप्तपदी केली असून त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडून आले आहेत, तर नेवासमधून निवडून आलेले शंकरराव गडाख आणि शेवगावमधून भाजपकडून पुन्हा बाजी मारलेल्या मोनिका राजळे यांच्या परिवारांमध्येही सोयरीक आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष (भोकरदन) निवडून आले आहेत. कोपरी-पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे यांना पुन्हा गुलाल लागला असून, त्यांचे पुत्र श्रीकांत हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील निवडून आले असून, त्यांचे पुत्र सुजय विखे हे नगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांनी कुलाबा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळविला.

मुख्यमंत्र्यांचे पीए अन् मंत्र्यांच्या पीएसची पत्नीही विधानसभेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार (भाजप) यांनी औसा, जि.लातूरमधून विद्यमान आमदार काँग्रेसचे बसवराज पाटील यांचा पराभव केला. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पीएस विद्याधर महाले यांच्या पत्नी श्वेता महाले (भाजप) यांनी चिखलीत (जि.बुलडाणा) काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांचा पराभव केला. त्या जिल्हा परिषदेच्या सभापती आहेत.

पवार कुटुंबात चौघे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत-जामखेडमधून जिंकले. आता पवार घराण्यात स्वत: शरद पवार राज्यसभेत, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार, पुतणे अजित पवार बारामतीचे आमदार आणि नातू रोहित असे चौघे लोकप्रतिनिधी आहेत.

वडील खासदार, कन्या आमदार

ज्येष्ठ नेते सुनील तटकरे हे रायगडचे खासदार आहेत तर त्यांच्या कन्या व रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदिती तटकरे राष्ट्रवादीकडूनच विधानसभेवर निवडून गेल्या.

बापलेक आमदार
विरारमधून जिंकलेले बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर व नालासोपारामधून विधानसभेवर निवडून आलेले क्षीतिज ठाकूर ही बापलेकाची जोडीही विधानसभेत दिसेल.

देशमुख बंधू

लातूरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख ही सख्ख्या भावांची जोडी विधानसभेत पोहोचली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे ते पुत्र आहेत. राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे माढातून (जि.सोलापूर) पुन्हा जिंकले. त्यांचे बंधू संजयमामा शिंदे करमाळातून अपक्ष जिंकले.

जावई जिंकला, सासरे पराभूत

राहुरी मतदारसंघातून भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांना धक्कादायकरीत्या पराभवाला सामारे जावे लागले असले तरी त्यांचे जावई संग्राम जगताप यांनी नगरमधून राष्ट्रवादीकडून विजय मिळवला आहे.

Web Title: Husband MP, wife MLA; Two pairs of brothers in the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.