वृद्धांना सरकारकडून मदतीची आशा

By Admin | Updated: June 15, 2015 05:41 IST2015-06-15T05:41:22+5:302015-06-15T05:41:22+5:30

ज्येष्ठ नागरिकांना समाजात, कुटुंबात मान मिळावा, वृद्धापकाळी त्यांना योग्य आधार मिळावा, या किमान अपेक्षा आजही पूर्ण होत नसल्याचेच समोर येत आहे

The hope for help from the government to the elderly | वृद्धांना सरकारकडून मदतीची आशा

वृद्धांना सरकारकडून मदतीची आशा

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना समाजात, कुटुंबात मान मिळावा, वृद्धापकाळी त्यांना योग्य आधार मिळावा, या किमान अपेक्षा आजही पूर्ण होत नसल्याचेच समोर येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात लोकप्रिय घोषणा केल्या जातात. पण ज्येष्ठांच्या समस्या मात्र ‘जैसे थे’ आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदा बनवून आठ वर्षे उलटली आहेत, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्हा पातळीवर प्राधिकरण त्यात सुरू होणे अपेक्षित होते. पण ते ही अजून झालेले नसल्याचे ‘हेल्प एज इंडिया’चे संचालक प्रकाश बोरगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
घरात ज्येष्ठ नागरिक असल्यास लहान मुलांवर चांगले संस्कार होतात. मुलांनाही त्यांचा आधार असतो. ज्येष्ठ नागरिकांना घरात आदर मिळत असे. पण गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांचा घरातच छळ होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. आयुष्याच्या सायंकाळी प्रेमळ आधार असावा, आपुलकी मिळावी एवढीच त्यांची अपेक्षा असते. प्रत्यक्षात ज्येष्ठांना येणारा अनुभव वेगळा असतो. या गोष्टींना आळा घालण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, पालक कल्याण व देखभाल कायदा २००७ अस्तित्वात आला. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
या कायद्यातील एका तरतूदीनुसार, प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र प्राधिकरण सुरू करण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे. पण, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हे प्राधिकरण सुरू झालेले नाही. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला होत असलेला त्रास, समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी या प्राधिकरणाने मदत करावी, असे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The hope for help from the government to the elderly