आधी पुनर्वसन योजना मंजूर करा, मगच एल्फिन्स्टन पूल बंद करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:14 IST2025-06-04T14:13:00+5:302025-06-04T14:14:22+5:30

यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

First approve the rehabilitation plan, only then close the Elphinstone Bridge: Guardian Minister Ashish Shelar | आधी पुनर्वसन योजना मंजूर करा, मगच एल्फिन्स्टन पूल बंद करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना

आधी पुनर्वसन योजना मंजूर करा, मगच एल्फिन्स्टन पूल बंद करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: परळ आणि प्रभादेवीला जोडणाऱ्या १२५ वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाजवळ असलेल्या काही रहिवासी इमारतींच्या पुनर्वसनाची योजना एमएमआरडीएने करावी आणि मगच पूल तोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी घेतली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एल्फिन्स्टन पूल २५ एप्रिल रोजी बंद करण्यात येणार होता. मात्र, स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित करीत विरोध केल्यानंतर पूल बंदचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. स्थानिक रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पूल बंद करण्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.  मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचीही काही स्थानिकांनी भेट घेऊन या प्रश्नावर मार्ग काढण्याची विनंती केली. 

मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची भीती

  • शेलार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना तेथील दोनपेक्षा अधिक बाधित रहिवासी इमारतींच्या एकत्रित पुनर्वसनाची योजना एमएमआरडीएने मंजूर करून घ्यावी आणि मगच पूल तोडण्याचा निर्णय घ्यावा, असे सांगितले.
  • शेलार हे मुंबई उपनगर  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
  • वरळी-शिवडी एलिव्हेटेड मार्गासाठी हा पूल बंद करण्यात येणार असून, नवीन डबल डेकर पूल एमएमआरडीएकडून उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
  • त्यासाठी हा पूल बंद होणार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

Web Title: First approve the rehabilitation plan, only then close the Elphinstone Bridge: Guardian Minister Ashish Shelar