‘ईटीआय’चा वाहकांना वैताग, कारवाईच्या भीतीने वाढतोय ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 01:36 AM2021-03-04T01:36:11+5:302021-03-04T01:36:18+5:30

मर्यादा संपल्यानंतरही घासून पुसून होतोय मशीनचा वापर

‘ETI’ annoys carriers, fever rises for fear of action | ‘ईटीआय’चा वाहकांना वैताग, कारवाईच्या भीतीने वाढतोय ताप

‘ईटीआय’चा वाहकांना वैताग, कारवाईच्या भीतीने वाढतोय ताप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एस. टी. महामंडळाने वापरात आणलेल्या ईटीआय मशीन आज वाहकांच्या जिवावर उठल्या आहेत. कालमर्यादा संपल्यानंतरही घासून घासून त्याच त्या मशीन वापरल्या जात असल्याने वाहक वैतागले आहेत. ही मशीन केव्हा बंद पडेल आणि वाहक तिकीट चोरीच्या गुन्ह्यात कसा अडकेल, याचा नेम राहिलेला नाही, याची भीती या कर्मचाऱ्यांना आहे.
 माहूर आगारातील वाहकाने एस. टी. बसमध्येच गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येने ईटीआयएम ऐरणीवर आली आहे. या वाहकाची मशीन बंद पडली. त्याचवेळी तपासणी पथक धडकले. त्यामुळे कारवाईत अडकलेल्या या वाहकाने जीवनयात्रा संपविली. मात्र, सुस्थितीतील मशीन वाहकांना मिळावीत, यासाठी एसटी प्रशासनाकडून तूर्तास तरी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न झालेले नाहीत. दररोज शेकडो मशीन बिघडण्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे दाखल होत आहेत. हे अधिकारी पाठपुरावा तेवढा करतात. एस. टी. प्रशासनाने मात्र या विषयाला अजून तरी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.

वर्षभरात ८,५०० तक्रारी
ईटीआय मशीन साथ देत नसल्याच्या वर्षभरात राज्यात ८,५०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने तक्रारी होत असतानाही नवीन मशीन आणण्यासाठी कारवाई होत नाही. महामंडळाने या मशीनमध्ये अनेक नवीन व्हर्जन टाकले आहेत. आधीच या मशीनची क्षमता संपलेली आहे. त्यात नवीन कामांचा भरणा झाला असल्याने या मशीन हँग होत असल्याच्या तक्रारी आहेत. मशीनमध्ये अचानक बिघाड होऊन तिकीट देणे थांबल्यास आणि त्याचवेळी तपासणी पथक दाखल झाल्यास वाहकांवर कारवाई केली जाते. निलंबनासारख्या कारवाईत ते अडकतात.
मागील काही वर्षांपासून ईटीआय मशीनची समस्या वाढली. बिघडलेल्या मशीन दुरुस्त करून वापरात आणल्या जातात. नवीन मशीनचा निर्णय मध्यवर्ती कार्यालयाकडून घेतला जातो. यासाठी पाठपुरावा होत आहे, असे एस. टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ईटीआय मशीनची समस्या वाढली, त्यामुळे वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही जणांना नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. एका वाहकाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे ईटीआय मशीनची कंत्राटदार कंपनी बदलून अन्य कंपनीला कंत्राट द्यावे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस

ईटीआय मशीन बंद पडल्यास सुरू होण्यास वेळ लागतो. काही प्रसंगी स्टार्ट बटन दाबताना अधिक तिकीट बाहेर येतात. याचा भुर्दंड वाहकाला बसतो. ज्या गावचे तिकीट निघाले तेथील प्रवासी न मिळाल्यास रक्कम भरावी लागते.
- वाहक

ईटीआय मशीन बंद पडल्यास एस. टी. बस थांबविता येत नाही. गर्दी असल्यास आणि त्याचवेळी पथक आल्यास वाहकाला दोषी ठरविले जाते. केस दाखल करून कारवाई केली जाते. मशीनमध्ये कालच्या तारखेचे तिकीट येते.
- वाहक

Web Title: ‘ETI’ annoys carriers, fever rises for fear of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.