निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:26 IST2025-07-30T16:25:53+5:302025-07-30T16:26:22+5:30

एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नावे ८७ एन्काउंटर आहेत.

Daya Nayak promoted to ACP 2 days before retirement, will retire on Thursday | निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर

निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर

मुंबई : मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेतील वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांना निवृत्तीच्या दोन दिवस आधी पदोन्नती मिळाली आहे. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक आता साहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) म्हणून पुढील दोन दिवस काम सांभाळतील. नायक यांच्यासह जीवन खरात, दीपक दळवी आणि पांडुरंग पवार यांनाही साहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. 

गृहविभागाने जारी केले आदेश 
गुन्हे शाखेत कार्यरत असलेले दया नायक १० महिन्यांपूर्वी एसीपी पदासाठी पात्र ठरले होते. नायक यांनी आतापर्यंत धडाकेबाज कारवाई करीत हजारांहून अधिक गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांच्या नावावर ८७ एन्काउंटरही आहेत. या एन्काउंटरमध्ये दाऊद टोळीतील २२, राजन टोळीतील २० गुंडांना त्यांनी टिपले. कंधार विमान अपहरण आणि रेल्वे बॉम्बस्फोटांच्या तपासातही त्यांचा सहभाग होता.

९० चे दशक अन् दया यांची एन्ट्री
दया नायक १९९५ मध्ये मुंबई पोलिसात रुजू झाले होते. त्याकाळी मुंबईमध्ये अंडरवर्ल्डचे मोठे जाळे पसरलेले होते. दाऊद इब्राहीम, छोटा राजन, रवी पुजारी यांसह अनेक कुख्यात गुन्हेगार आपल्या टोळ्या चालवायचे. १९९३ मधील बॉम्बस्फोटांनी तर मुंबईसह संपूर्ण भारत हादरला होता. मुंबईत अंडरवर्ल्डचा प्रभाव पोलिसांसाठी एक गंभीर आव्हान बनत होता. टोळीयुद्ध, खंडणी, धमक्या आणि खुनामुळे शहरातील वातावरण दुषीत झाले होते.

अशा कठीण काळात दया नायक मुंबई पोलिसात दाखल झाले. १९९६ मध्ये त्यांनी दक्षिण मुंबईत छोटा राजन टोळीतील दोन साथीदार विनोद मतकर आणि रफिक यांना ठार मारले. याची चर्चा माध्यमांमध्ये झाली. त्यांच्या धाडसी कारवाईने गुन्हेगारांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. १९९८ पर्यंत दया नायक मुंबई पोलिसांमध्ये एक प्रसिद्ध नाव बनले होते. नायक यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) देखील काम केले. आता अनेक वर्षांच्या सेवेनंतर त्यांना पदन्नती देण्यात आली आहे.

Web Title: Daya Nayak promoted to ACP 2 days before retirement, will retire on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.