छगन भुजबळ यांच्यासह समीर, पंकज भुजबळ यांना न्यायालयाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 03:07 AM2019-10-18T03:07:37+5:302019-10-18T06:37:28+5:30

महाराष्ट्र सदन घोटाळा; भुजबळ यांचा जामीन रद्द करण्यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज

Court notice to Sameer and Pankaj Bhujbal along with Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांच्यासह समीर, पंकज भुजबळ यांना न्यायालयाची नोटीस

छगन भुजबळ यांच्यासह समीर, पंकज भुजबळ यांना न्यायालयाची नोटीस

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व त्यांचा मुलगा पंकज भुजबळ व पुतणे समीर भुजबळ यांना मंजूर केलेला जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (एमईटी) च्या एका माजी कर्मचाऱ्याने विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला. भुजबळ साक्षीदारांना धमकावत असल्याचा आरोप कर्मचाºयाने केला आहे. त्यावर न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह समीर व पंकज यांना नोटीस बजावली.

एमईटीच्या माजी कर्मचारी मल्लिका कोटियन यांनी छगन भुजबळ, पंकज व समीर यांचा जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. त्यांनी केलेल्या अर्जानुसार, सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) असलेली साक्षीदारांची यादी भुजबळ यांच्याकडेही आहे. त्यात एमईटीच्या काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यातील तिघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्जही केला आहे. मात्र, या साक्षीदारांना माफीचा साक्षीदार होण्यापासून अडविण्याकरिता भुजबळांकडून बेकायदेशीर मार्गाने प्रयत्न करण्यात येत आहेत.

‘समीर कर्वे (एमईटीचे माजी संस्थापक) यांच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे स्टेशनजवळ त्यांचे पोस्टर्स लावत असताना नीलेश साहू (भुजबळ यांचा स्वीय साहाय्यक) याने कंत्राटदाराच्या कामगारांना मारहाण केली व त्यांच्यावर बंदूक रोखून पोस्टर्स लावण्याचे काम थांबविण्यास सांगितले. तसेच आधी ज्या ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आली ती सर्व फाडण्यात आली. या प्रकरणी मी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यावरून साहू याला अटक करण्यात आली व चौकशी करण्यात आली,’ असे कोटियन यांनी अर्जात म्हटले आहे.

चौकशीअंती हे काम भुजबळांसाठी करण्यात आल्याचे उघडकीस आले, असे कोटियन यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी न्यायालयाला सांगितले.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह समीर व पंकज भुजबळ यांची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने त्यांना साक्षीदारांवर दबाव टाकण्याची किंवा त्यांना न धमकावण्याची अट घातली होती. भुजबळ या अटीचे उल्लंघन करत आहेत, असा आरोप करत कोटियन यांनी छगन भुजबळांसह समीर व पंकज यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ व नीलेश साहू यांना नोटीस बजावत या अर्जावरील पुढील सुनावणी १३ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

पुढील सुनावणी १३ नोव्हेंबरला

न्यायालयाने छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ व निलेश साहू यांना नोटीस बजावित या अर्जावरील पुढील सुनावणी १३ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

Web Title: Court notice to Sameer and Pankaj Bhujbal along with Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.