CoronaVaccine: आजपासूनच 18 वर्षांवरील लसीकरण; लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 06:21 AM2021-05-01T06:21:54+5:302021-05-01T06:25:06+5:30

मुख्यमंत्र्यांची घोषणा, लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे आवाहन

CoronaVaccine: Vaccination over 18 years of age from today; CM Uddhav Thackeray appeals not to crowd vaccination centers | CoronaVaccine: आजपासूनच 18 वर्षांवरील लसीकरण; लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

CoronaVaccine: आजपासूनच 18 वर्षांवरील लसीकरण; लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Next

मुंबई : राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी १ मे सूनच कोरोना लसीकरणाला सुरुवात केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेला संबोधित करताना केली. लसींचा पुरवठा अतिशय मर्यादित असल्याने उपलब्धतेनुसारच लसीकरण करावे लागेल, असे स्पष्ट करून त्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करून या केंद्रांचे कोरोना प्रसारक मंडळ होऊ देऊ नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

आतापर्यंत ४५ वर्षे वयावरील व्यक्तींना राज्यात १ कोटी ५८ लाख डोस देण्यात आले आहेत. १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी आपल्याकडे फक्त तीन लाख लसींचाच साठा आज उपलब्ध आहे. तरीही उद्यापासूनच लसीकरण सुरू केले जाईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी १ तारखेच्या मुहूर्ताबाबतची अनिश्चितता संपविली.

१८ ते ४४ वर्षे  या वयोगटाच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राने राज्यावर टाकली आहे, आपण ती समर्थपणे पार पाडूच; पण लस पुरवठा केंद्राकडून होणार आहे. तो तातडीने वाढवून द्यावा, ही माझी पंतप्रधानांना कळकळीची विनंती आहे, असे ठाकरे म्हणाले. ४५ वर्षे वयावरील व्यक्तींसाठीचे लसीकरण पूर्वीप्रमाणेच सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसंख्या, रुग्णसंख्येच्या आधारे लसी राज्यात पुरविल्या जातील. कोरोनापासून राज्याला मुक्त करण्यासाठी लसीकरणाच्या मोहिमेसाठीची यंत्रणा कुठेही कमी पडू देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत आपण या संकटातून बाहेर पडू, जून-जुलैपासून लसपुरवठा वाढेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

१२ कोटी डोस द्या, एकरकमी चेक देतो

केंद्र सरकारने महाराष्ट्राला लसींचा पुरवठा वाढवून द्यावा. आज १२ कोटी डोस देणार असतील तर त्यासाठीचा एकरकमी चेक देण्याची महाराष्ट्रातील जनतेसाठी माझ्या सरकारची तयारी आहे. आर्थिक चणचण असली तरी मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी राज्यातील जनतेचा जीव महत्त्वाचा आहे. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

रुग्णवाढ स्थिरावली

राज्यात गेल्या तीन-चार दिवसांत कोरोना रुग्णवाढीचा दर स्थिरावला आहे. सरकारचे निर्बंध आणि जनतेने संयम दाखवत दिलेली साथ यामुळे ते शक्य झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. ही लाट थोपविण्यासाठीची यंत्रणा सज्ज केली जात आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

रेमडेसिविरचा अनावश्यक वापर नको

रेमडेसिविर इंजेक्शनचा अनाठायी, अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला तसेच डॉक्टर व रुग्णालयांनादेखील केले. रेमडेसिविरचा पुरवठा मर्यादित आहे. गरजेपेक्षा ते जास्त घेतले तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

‘मी राजकारण  करणार नाही’

मध्यंतरी आपल्याला काही जणांनी भडकविण्याचा प्रयत्न केला. मी राजकारण करणार नाही. जे लोक गैरसमज पसरवत असतील त्यांच्यासाठी मी नंतर जाहीर सभा जरूर घेईन; पण आज ती वेळ नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला.  

महाराष्ट्र, कामगार दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा देऊन मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की, राज्य पुन्हा एकदा सुवर्ण झळाळी घेईल. लॉकडाऊनमध्ये लोकांची रोजी गेली, तरी रोटी जाऊ नये, म्हणून आपण साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते आणि त्याचे वाटपही सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना काळात वाढविलेल्या आरोग्य सुविधांची आकडेवारीही त्यांनी दिली.

राज्याचे स्वतंत्र अ‍ॅप असावे

लसीकरणासाठीचे अ‍ॅप काल क्रॅश झाले. हा गोंधळ होऊ नये म्हणून केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला स्वत:चे अ‍ॅप सुरू करण्याची व ते केंद्राच्या अ‍ॅपशी जोडण्याची परवानगी द्यावी.

Web Title: CoronaVaccine: Vaccination over 18 years of age from today; CM Uddhav Thackeray appeals not to crowd vaccination centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.