...अन् ‘जेजे’ने ठोकला दावा! पत्रव्यवहाराचा पत्ता बदलला आणि जागेचाही पडला विसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 06:56 IST2026-04-26T06:56:22+5:302026-04-26T06:56:54+5:30
पहिल्या नूतनीकरणापर्यंत जेजेच्या नावाने सुरू होता पत्रव्यवहार

...अन् ‘जेजे’ने ठोकला दावा! पत्रव्यवहाराचा पत्ता बदलला आणि जागेचाही पडला विसर
मुंबई - पहिल्या नूतनीकरणापर्यंत या जागेच्या संदर्भातील पत्रव्यवहार जेजे रुग्णालयाच्या नावाने सुरू होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात पत्रव्यवहाराचा पत्ता फोर्टच्या एका खासगी कार्यालयाच्या नावाने करण्यास सुरुवात झाली. जागेचा पत्ता कुणी, कसा व का बदलला, याची फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र नंतर पत्रव्यवहार बॅक स्ट्रीट, फोर्ट- १ च्या एका इमारतीच्या नावाने करण्यात आला.
२०१७ साली या भाडेपट्याच्या नूतनीकरणाची वेळ आली. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व पत्रव्यवहार नवीन पत्त्यावर सुरू होता. अनेकदा भाडेपट्टा नूतनीकरणासंदर्भात स्मरण पत्रे पाठविली. चार वर्षांपर्यंत भाडेपट्टा नूतनीकरणाची मुदत होती, ती संपली. अखेर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी २५ ऑक्टोबर २०२१ रोजी जमिनीचा वापर मंजूर कामासाठी होत नसल्याने सुनावणी आयोजित केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या नोटीसवर फोर्ट कार्यालयाचा पत्ता आहे. फोर्टच्या या पत्त्यावर कुणीही उपलब्ध नसल्याने तेथे नोटीस चिकटवली. मात्र, कुणीही सुनावणीस उपस्थित राहिले नाही. (या आशयाचे मुंबई उपनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचे पत्र ‘लोकमत’कडे आहे.) त्यानंतर दोन वर्षे काही झाले नाही. अखेर गोरेगावच्या नगर भूमापन अधिकारी यांनी १२ डिसेंबर २०२४ रोजी ‘कोकण विभाग प्रशिक्षण संस्था’, ‘शासकीय कार्यालये व शासकीय कामासाठी’ ही जागा द्यावी, असे पत्र विभागीय कोकण आयुक्तांना पाठविले. (गोरेगाव नगर भूमापन अधिकारी यांचे पत्रही ‘लोकमत’कडे आहे.)
...अन् ‘जेजे’ने ठोकला दावा
जेजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राठोड यांनी या माहितीचा शोध घेण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मला या विषयाची माहिती मिळताच मी तत्कालीन डीन यांना सांगितले. मात्र, मध्येच त्यांची बढतीवर बदली झाली. त्यांनतर हा विषय विद्यमान अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्यापुढे गेला. त्यांनी या प्रक्रियेला अधिक वेग दिला. या संदर्भातील कागदपत्रे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळविण्यात त्यांना बरेच यश आले. त्यानंतर जेजे रुग्णालयाने या जागेवर दावा करून पत्रव्यवहार सुरू केला. डॉ. राठोड यांनी जागेची माहिती मिळवून पत्ता शोधत २०२५ साली सप्टेंबर महिन्यात अधिष्ठाता डॉ. भंडारवार यांच्यासोबत जाऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यानंतर डॉ. भंडारवार यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार केला. त्यानंतर महसूल मंत्री कार्यालयात गुरुवार, २३ एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती, पण ती झाली नाही.
प्रशिक्षण संस्था उभारता येईल
मढ आयलंड येथील जागा सर जेजे हॉस्पिटल असोसिएशनच्या नावे आहे. मात्र, शासनाच्या दुसऱ्या संस्थेकडे ती हस्तांतरित करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यावर आम्हाला या जागेची गरज आहे, अशी विनंती शासनाला केली आहे. गेल्या काही वर्षांत आमच्याकडे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यासाठी आम्हाला ग्रामीण आरोग्य सेंटरची गरज आहे. ही जागा मिळाल्यास तेथे तरुण डॉक्टरांसाठी प्रशिक्षण संस्था उभारता येईल.
डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, सर जेजे रुग्णालय