Mumbai: वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीवरून काँग्रेस अन् भाजपत चांगलीच जुंपली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 09:28 IST2025-11-19T09:26:44+5:302025-11-19T09:28:01+5:30
Bandra Fort Liquor Party Controversy: मुंबईतील ४०० वर्षे जुना व ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या वांद्रे किल्ल्यावर झालेल्या दारू पार्टीवरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे.

Mumbai: वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीवरून काँग्रेस अन् भाजपत चांगलीच जुंपली!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबईतील ४०० वर्षे जुना व ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी झाली. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांनी शेलार यांच्यावर टीका करत भाजपचा दुतोंडीपणा योग्य नसल्याचे म्हटले आहे, तर शेलार यांनी या प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले.
वांद्रे किल्यावरील दारू पार्टीचा प्रकार उद्धवसेनेचे अखिल चित्रे यांनी उघडकीस आणला होता. ऐतिहासिक किल्ल्यात अशा पार्ट्यांचे आयोजन कसे झाले? मंत्री शेलार यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम झाल्याने ४८ तास उलटले तरी कुणावर कारवाई का झाली नाही हे आता समजले, असा टोला त्यांनी लगावला.
मतदारसंघातील कार्यक्रम असल्याने तिथे गेलो होतो. कार्यक्रमाला मतदारसंघातील लोकांनी आणि पर्यटन विभागाने सहकार्य केले. परवानगी कार्यक्रमाला होती मात्र, दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करून तिथे कुणी मद्य विक्री केली असेल तर त्याच्या चौकशीचे व दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.- आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री