'ठाकरे घराण्याची दृढता अन् मनं जिंकणारा स्वभाव'; अजितदादांचा उद्धव ठाकरेंसाठी खास लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 10:09 AM2020-07-27T10:09:26+5:302020-07-27T10:46:53+5:30

CM Uddhav Thackeray Birthday: एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने संकटकाळात राज्यातील जनतेला विश्वासात घेऊन कसा धीर द्यावा, राज्यावरील संकटाच्या विरोधात लढण्यासाठी समस्त जनतेला कसं एकजूट करावं, याचं आदर्श उदाहरण म्हणणे उद्धवजी जनतेशी साधत असलेला संवाद... अजित पवारांनी 'लोकमत'साठी लिहिलेला लेख

CM Uddhav Thackeray Birthday: Ajit Pawar special article for uddhav thackeray | 'ठाकरे घराण्याची दृढता अन् मनं जिंकणारा स्वभाव'; अजितदादांचा उद्धव ठाकरेंसाठी खास लेख

'ठाकरे घराण्याची दृढता अन् मनं जिंकणारा स्वभाव'; अजितदादांचा उद्धव ठाकरेंसाठी खास लेख

googlenewsNext

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं सर्वात पहिल्यांदा मी त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन करतो. उद्धवजींना वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा देतो. 
उद्धवजींच्या ‘ठाकरे’ कुटुंबाला महाराष्ट्रात मोठं वलंय लाभलं आहे. हे वलय स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांमुळे मिळालं आहे. या दिग्गज नेत्यांचा वैचारिक, राजकीय वारसा आणि कार्यकर्तृत्वाची परंपरा पुढे नेण्याचं काम उद्धवजी समर्थपणे करत आहेत, याचा माझ्यासारख्या सहकाऱ्याला आनंद आहे.

उद्धवजींच्या व्यक्तिमत्वात ‘ठाकरे’ घराण्याची दृढता आहेच, त्याचबरोबर त्यांचा शांत, संयमी, निगर्वी स्वभाव राज्यातील जनतेची मनं जिंकून घेणारा आहे. उद्धवजींच्या वागण्यातील सहजता, विनम्रता, सुसंस्कृतपणा जनतेला भावणारा आहे. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर दूरचित्रवाणीच्या माध्यमातून उद्धवजी राज्यातील जनतेशी साधत असलेला संवाद हा एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांने संकटकाळात राज्यातील जनतेला विश्वासात घेऊन कसा धीर द्यावा, राज्यावरील संकटाच्या विरोधात लढण्यासाठी समस्त जनतेला कसं एकजूट करावं, याचं आदर्श उदाहरण आहे.

उद्धवजी आज राज्याच्या कुटुंबप्रमुखांच्या भूमिकेत आहेत. राज्याचे, मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून ते जबाबदारी बजावत आहेत. हे करत असताना मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. सहकारी मंत्र्यांकडे जबाबदारी सोपवताना अधिकार व स्वातंत्र्यही त्यांनी दिलं आहे. यामुळेच कोरोनाविरोधातल्या लढाईत संपूर्ण महाराष्ट्र आज एकजुटीनं, संपूर्ण क्षमतेनं लढत असल्याचं चित्र दिसत आहे.

राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक सहकारी, राज्य प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी आज कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन लढत आहेत. आपले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, अंगणावाडी ताई, आशा ताई, पोलिस बांधव, स्थानिक स्वराज संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते असे अनेक जण जोखीम पत्करुन कर्तव्यं पार पाडत आहेत. नागरिकही कोरोनाविरुद्धच्या लढाईत सक्रीय योगदान देत आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई अस्तित्वाची लढाई असल्यानं ती जिंकण्यासाठी सर्वांची एकजूट महत्वाची होती. ही एकजूट साधण्याचं श्रेय जसं, राज्यातील प्रत्येक व्यक्तीनं दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठेला, संघभावनेला आहे. तसंच ही संघभावना निर्माण करण्यासाठी, टिकवण्यासाठी राज्याच्या नेतृत्वानं केलेल्या प्रयत्नांना देखील याचं खुप मोठं श्रेय आहे, असं मला वाटतं.

उद्धवजींचा शिवसेना पक्ष आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायम एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून वावरत आले आहेत. आज राज्यातील जनतेच्या भल्यासाठी व काळाची गरज म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत. महाविकास आघाडीचा निर्णय सर्वांनी विचारपूर्वक घेतला आहे. आमच्या एकत्र येण्यामागे भूमिका आहे. राजकारणात पक्षीय भूमिका वेगवेगळी असू शकेल, विचारभिन्नता, मतभिन्नता असू शकेल, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात कायमची कटुता, शत्रूता, वैर असू नये. महाराष्ट्राच्या विकासासाठी, जनतेच्या भल्यासाठी, काळाची गरज म्हणून राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, सर्वांनी मिळून राज्यासाठी काम केलं पाहिजे, हा संदेश महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. अर्थातंच याचं नेतृत्वं उद्धवजींकडे आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची धोरणे, विचारधारा वेगळ्या आहेत, परंतु ध्येय एकंच आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचा सर्वांगीण, सर्वसमावेशक विकास करणं. राज्यातील जनतेचं अधिकाधिक भलं करणं. राज्याचं हित जपणं व राज्यावरील संकटांचा निर्धारानं मुकाबला करणं, हेच आमचं मुख्य ध्येय आहे. महाराष्ट्राच्या हितासाठीच आम्ही काम करत असल्यानं, पक्षीय विचारधारा वेगळी असूनही विशेष अडचण जाणवत नाही. याचं श्रेय अर्थातंच उध्दवजींच्या समजूतदारपणाला, त्यांच्या शांत, संयमी, सुसंस्कृत, निगर्वी नेतृत्वाला आहे. त्यांच्या रुपानं महाविकास आघाडीला सक्षम, सर्वांना सोबत घेऊन जाणारं कुशल नेतृत्वं लाभलं आहे. या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार कोरोनासह राज्यासमोरील संकटांचा यशस्वी मुकाबला करेल, राज्याला विकासाच्या मार्गावर पुढे नेईल, असा विश्वास आहे.

उद्धवजींबद्दल सांगायचं तर, त्यांचं नेतृत्वं भक्कम आहे. वैचारिक बैठकही पक्की आहे. सहकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास आहे. कुठल्याही परिस्थितीत ते विचलित होत नाहीत. तोल जराही ढळू देत नाहीत. वस्तूस्थिती समजून घेऊन, परिस्थितीचा समतोल विचार, सखोल अभ्यास करुन निर्णय घेतात. त्या निर्णयात ‘दृढता’ असते. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून सहकाऱ्यांना पटवून देण्याची क्षमता, कौशल्य त्यांच्याकडे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांना धक्का न लावता बदलत्या काळाशी सुसंगत भूमिका घेणं आवश्यक आहे, हे शिवसैनिकांना समजावण्यात ते यशस्वी ठरले ते केवळ त्यांच्या निर्णयक्षमतेतील  दृढतेमुळेच. 

ठाकरे कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीनं निवडणूक लढवू नये ही आजवर चालत आलेली भूमिका काळानुसार बदलली पाहिजे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपले चिरंजीव अदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची परवानगी दिली. नंतरच्या काळात आदरणीय पवार साहेबांच्या आग्रहाखातर स्वत: राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली. शिवसेनेची कार्यपद्धती लक्षात घेता सरकारबाहेर राहूनही ते अधिकार गाजवू शकले असते, परंतु मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारुन राज्यासमोरील आव्हानांना स्वत: भिडण्याची हिंमत त्यांनी दाखवली. स्वत: आघाडीवर राहून राज्याचं नेतृत्वं करणं पसंद केलं. यातून आव्हानांना सामोरं जाण्याची त्यांची लढावू वृत्ती दिसून येते, महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असताना त्यांची ही लढावू वृत्ती निश्चितंच राज्याला उपयोगी पडत आहे, असं मला वाटतं.

उद्धवजींनी त्यांच्या क्षमतेबद्दलचे अनेक गैरसमज बोलून दूर करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून दूर केले आहेत. उद्धवजींनी शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची जबाबदारी स्विकारली तेव्हा त्यांच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्हं निर्माण केली जात होती. राज्याचं मुख्यमंत्रीपद स्विकारलं, त्यावेळीही उद्धवजींच्या क्षमतेबद्दल काहींनी शंका उपस्थित केली होती. परंतु त्या प्रत्येकाची शंका खोटी ठरवण्यात ते नक्कीच यशस्वी ठरत आले आहेत. उद्धवजींनी त्यांच्या विचार, वर्तन, कर्तृत्वानं अनेकांना त्यांच्याबद्दलची चुकीचं मतं बदलायला भाग पाडलं आहे. देशात वलय असलेल्या ठाकरे कुटुंबाचे प्रतिनिधी, शिवसेनेसारख्या प्रखर संघटनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री इतकी ताकद जवळ असूनही उद्धवजींचा शांत, संयमी स्वभाव, त्यांचा विनम्रपणा लोकांना भावणारा आहे. हीच त्यांची मोठी ताकद आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी सेनानी प्रबोधनकार ठाकरे साहेबांचे नातू, महाराष्ट्राच्या अस्मितेची आग धगधगती ठेवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धवजी, आज त्यांचा हिरकमहोत्सवी वाढदिवस साजरा करीत आहेत. हा वाढदिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आहे, शिवसेना पक्षप्रमुखांचा आहे. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचा आहे. फोटोग्राफीचा छंद जोपासणाऱ्या कलावंताचा वाढदिवस आहे. लाखो शिवसैनिकांच्या आधारस्तंभाचा हा वाढदिवस आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचा हा वाढदिवस आहे. उद्धवजींचा वाढदिवस आज साजरा होत असताना मंत्रिमंडळातील एक सहकारी, महाराष्ट्रप्रेमी म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी होताना आम्हा सर्वांनाही निश्चित आनंद होत आहे. 

सन्माननीय उद्धवजींच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिष्टचिंतन करतो. त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींना त्यांच्या प्रत्येक पावलावर समर्थ साथ देणाऱ्या सौ. रश्मीताईंना, ठाकरे ठाकरे कुटुंबाचे तरुण सदस्य चि. अदित्य व चि. तेजस यांना, लाखो शिवसैनिकांच्या शिवसेना परिवारालाही मी उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा देतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू, पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील, जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.    

Web Title: CM Uddhav Thackeray Birthday: Ajit Pawar special article for uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.