“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 14:34 IST2024-04-30T14:32:01+5:302024-04-30T14:34:58+5:30
CM Eknath Shinde: गेल्या दोन वर्षांपासून महायुती सरकारने मुंबईत चांगली कामे केली आहेत. महायुतीने केलेल्या कामांची पावती जनता देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
CM Eknath Shinde: गेल्या दोन वर्षांपासून महायुती सरकारने मुंबईत चांगली कामे केली आहेत. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी केलेले काम लोकांसमोर आहे. महायुतीने केलेल्या कामांची पावती जनता देईल. पियुष गोयल यांच्यासह मुंबईतील सर्व जागा महायुती नक्की जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
उत्तर मुंबईचे भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पियुष गोयल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मुंबईत विजयाचा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेकडून मुंबईत तीनही उमेदवार मराठी दिलेले आहेत. पियुष गोयल मुंबईकर आहेत. त्यामुळे पियुष गोयल अमराठी आहेत, अशा प्रकारचा आक्षेप घेता कामा नये. कोणालाही तसा आक्षेप घेण्याचा अधिकार नाही. पियुष गोयल प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
गेल्या २५ वर्षांत जेवढे काम झाले नाही, तेवढे काम दोन वर्षांत करण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे. या कामांचा परिणाम या निवडणुकीतून नक्की दिसून येईल, असे सांगत आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या काळात किती झाडे कापली गेली, याचा हिशोब त्यांनी आधी द्यायला हवा. त्यांची सत्ता येणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवात फिरणे, अशी गत आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.