शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 06:35 IST2025-08-19T06:34:55+5:302025-08-19T06:35:55+5:30

५० हून अधिक विद्यार्थी ४ अटेंडंट महिलांची सुटका

Children on their way to school at the police station! Two school buses stuck in knee-deep water at matunga | शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...

शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माटुंगा येथील गांधी मार्केट परिसरात सोमवारी सकाळी गुडघाभर पाण्यात अडकलेल्या दोन स्कूल बसमधील ५० विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढून पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर, मुलांना पालकांच्या ताब्यात दिल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

मुसळधार गांधी मार्केट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर गुडघाभर पाणी साचले होते. दोन स्कूल बस या पाण्यात बंद पडल्या. त्यात एकूण ५० हून अधिक विद्यार्थी आणि चार अटेंडंट महिलाचा समावेश होता. या प्रकारामुळे चिमुकले घाबरले होते. दुसरीकडे चालक, अटेंडंट महिलांकडून परिस्थितीची माहिती मिळताच पालकवर्गही चिंतेत होता. याबाबतची माहिती परिमंडळ ४चे उपआयुक्त आर. रागसुधा यांना मिळताच त्यांनी माटुंगा ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पवार यांना बचावकार्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी विद्यार्थी, अटेंडंट महिला, चालकांना बाहेर काढले.

तुमची सुरक्षितता नेहमी मोजमापापलीकडेच...

पोलिसांनी विद्यार्थ्यांना लहान मुलांसाठी खास तयार केलेल्या बाल कक्षात आणले. खाऊ देऊन संवाद साधला. पालकांनी पोलिस ठाणे गाठून मुलांना घरी नेले. पाण्यात अडकलेल्या अनेकांना पोलिसांनी मदत केली. वाहतूक पोलिसांनी इन्स्टाग्राम, एक्सवरील अकाऊंटद्वारे कुठे पाणी साचले? कुठे वाहतूक संथ गतीने सुरू आहे? असे अपडेट दिले. वाहतूक सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून मार्गदर्शन करत होते. मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर म्हटले की, ‘मुंबईचा मान्सून कितीही मिलिमीटरने बरसला, तुमची सुरक्षितता आमच्यासाठी नेहमी मोजमापापलीकडेच असेल!’

आज मोठा पाऊस का पडणार?

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत आहे. मंगळवारी हे क्षेत्र मुंबईजवळ असल्याने त्याचा प्रभाव महामुंबईवर अधिक असेल. त्यामुळे मंगळवारी मोठया पावसाची शक्यता आहे. बुधवारी मात्र हे क्षेत्र गुजरातकडे सरकल्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी ‘लाेकमत’ला दिली.

मुसळधार पावसाचा मारा मंगळवारीही कायम राहणार असून, हवामान खात्याने संपूर्ण कोकणासह महामुंबईला ‘रेड अलर्ट’ दिला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र, ईस्ट-वेस्ट शेअर झोन आणि सायक्लॉनिक सर्क्युलेशनचा संयुक्त प्रभाव म्हणून संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची नोंद झाली.

Web Title: Children on their way to school at the police station! Two school buses stuck in knee-deep water at matunga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.