"स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:18 IST2020-07-27T15:15:19+5:302020-07-27T15:18:57+5:30

अजित पवारांनी शेअर केलेल्या ट्विटच्या फोटोवरुन चर्चा रंगली असताना आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Chief Minister Uddhav Thackeray should focus on national politics, said Shiv Sena leader Sanjay Raut | "स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो"

"स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो"

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, शुभेच्छा देताना ट्वीट केलेल्या फोटोमुळे भलतीच चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ट्विटर हॅँडलवरून आज सकाळीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात ते म्हणतात. ''शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.'' या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे एका छोट्या गाडीतून जात असून, त्यामध्ये गाडी अजित पवार चालवत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अजित पवारांनी शेअर केलेल्या ट्विटच्या फोटोवरुन चर्चा रंगली असताना आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. छायाचित्रात स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो, असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांनी आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची गरज असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

देशाच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण होताना दिसते. शरद पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं,  त्याच्यात त्या क्षमता आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्राचा चेहरा असतो, राष्ट्रचं राज्यावर लक्ष असते. आता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालायला हवे, असं संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांनी शेअर केलेला फोटो बारामतीच्या कृषी प्रदर्शनातीलआहे. उद्धव ठाकरे व अजित पवार हे एका गाडीत बसून कृषी प्रदर्शन पाहत आहेत. गाडीचं स्टिअरिंग अजित पवारांच्या हातात आहे, असा तो फोटो आहे. त्यामुळं सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray should focus on national politics, said Shiv Sena leader Sanjay Raut