जलवाहिनी फुटल्यामुळे बोरीवलीकरांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:30 AM2019-05-09T03:30:29+5:302019-05-09T03:30:52+5:30

तलावांमधील जलसाठ्यांत दिवसेंदिवस घट होत असल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात अधूनमधून फुटणाऱ्या जलवाहिन्यांनी अडचणीत भर घातली आहे.

 Borivalkar's description due to water scarcity | जलवाहिनी फुटल्यामुळे बोरीवलीकरांची वणवण

जलवाहिनी फुटल्यामुळे बोरीवलीकरांची वणवण

Next

मुंबई : तलावांमधील जलसाठ्यांत दिवसेंदिवस घट होत असल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात अधूनमधून फुटणाऱ्या जलवाहिन्यांनी अडचणीत भर घातली आहे. बोरीवली पूर्व येथे जलवाहिनी फुटल्यामुळे स्थानिक रहिवाशांना बुधवारी दिवसभर पाण्यासाठी वणवण करावी लागली. पाण्याच्या बाटल्या दामदुप्पट रकमेत खरेदी करून नागरिकांनी आपली तहान भागविली.

तलावांमध्ये आवश्यकतेपेक्षा नऊ टक्के कमी जलसाठा असल्याने नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. सध्या तलावांमध्ये २२ टक्के जलसाठा असल्याने पावसाला सुरुवात होईपर्यंत टेन्शन नाही, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र मुंबईतील अनेक भागांमध्ये विशेषत: पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेच्या टोकाला असलेल्या वस्त्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावत असते. बोरीवली पूर्व येथे गेले काही महिने पाण्याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत.

बोरीवली पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ९० फूट जंक्शनजवळ मंगळवारी मध्यरात्री १ वाजता जलवाहिनी फुटली. दुरुस्ती करण्यासाठी पालिकेचे अधिकारी पोहोचले, मात्र बुधवारी रात्री उशीरा या पाइपलाइन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. पण पाइपलाइन फुटल्याने रहिवाशांचे हाल झाले.

नेहमीच फुटते जलवाहिनी
बोरीवली परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने अनेक वेळा जलवाहिनी फुटत असते. अनेकवेळा तक्रार करूनही विभाग कार्यालयातून पाण्याचा टँकरही पाठविण्यात आला नाही. आधीच पाणीकपात आणि त्यात जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे, असे स्थानिक नगरसेवक विद्यार्थी सिंह यांनी सांगितले.

पुरवठा सुरळीत होणार
जलवाहिनी दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. काम पूर्ण होताच रहिवाशांना पुन्हा एकदा सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे आर मध्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title:  Borivalkar's description due to water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.