बेपत्ता झालेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

By Admin | Updated: March 11, 2015 01:28 IST2015-03-11T01:28:33+5:302015-03-11T01:28:33+5:30

घरातून गायब झालेल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह काल दुपारी मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील नाल्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे

The body of the missing chimney was found | बेपत्ता झालेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

बेपत्ता झालेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

मुंबई : घरातून गायब झालेल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह काल दुपारी मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील नाल्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. या चिमुरड्याची हत्या झाल्याचा संशय ट्रॉम्बे पोलिसांना आहे. विशेष म्हणजे संशयाची सुई चिमुरड्याच्या बापावर रोखलेली असून पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
समशेर शेख असे संशयित बापाचे नाव असून तो पत्नी व तीन मुलांसह चिता कॅम्प येथील खाडीलगतच्या झोपडीत राहतो. ६ मार्चच्या मध्यरात्री त्यांचा दीड वर्षाचा चिमुरडा बेपत्ता झाला. पहाटे ही बाब उघड झाली. त्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तक्रार देताना समशेर यांनी घरातून काही वस्तूही चोरी झाल्याचा दावा केला होता.
मात्र झोपडीचे दार आतून बंद असताना चोर आत शिरलाच कसा, त्याने अन्य वस्तूंसोबत मूलही पळवले हे मुद्दे खटकत होते.
अशात तपास सुरू असताना काल दुपारी चारच्या सुमारास मानखुर्द रेल्वे स्टेशनजवळील महाराष्ट्र नगर परिसरातील नाल्यात स्थानिक मच्छीमाराची नजर अब्दुल्लाच्या मृतदेहावर पडली. पोलिसांनी चिमुरड्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धाडला. प्राथमिक अहवालात चिमुरड्या अब्दुल्लाचा मृत्यू पाण्यात गुदमरून झाला, असे नमूद करण्यात आले.
दरम्यान, सुरुवातीपासून पोलिसांचा संशय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समशेरवर होता. दोन वर्षांपासून गावी असलेला समशेर महिन्याभरापूर्वीच मुंबईत दाखल झाला होता. त्याला ही झोपडी विकण्याचे वेध लागले होते.
समशेर गेल्या काही दिवसांपासून कोणाकोणाच्या संपर्कात होता त्याची, संपर्कातल्या व्यक्तींची चौकशी पोलिसांनी सुरू केल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: The body of the missing chimney was found