“बोललो होतो, मुंबईचा महापौर हिंदू होणार, मराठी होणार”; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:15 IST2026-02-07T14:15:43+5:302026-02-07T14:15:43+5:30
BMC Mayor 2026: आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.

“बोललो होतो, मुंबईचा महापौर हिंदू होणार, मराठी होणार”; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया
BMC Mayor 2026: ठाकरे बंधूना पराभवाची धूळ चारत भाजपा-शिंदेसेनेने मुंबई मनपा निवडणूक बहुमताचा आकडा गाठत जिंकली. यानंतर मुंबईचे महापौरपद ‘सर्वसाधारण प्रवर्ग – महिला’ या गटासाठी आरक्षित झाले. मुंबईचा महापौर कोण होणार, यावरून अनेक तर्क-वितर्क, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. अखेरीस भाजपा आणि शिंदेसेनेने महापौर, उपमहापौर पदासाठी रितू तावडे आणि संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर आता नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली.
नितेश राणेंनी सोशल मिडीया पोस्ट करत म्हटलंय की, बोललो होतो.. मुंबई चा महापौर..हिंदू होणार... मराठी होणार.. महायुती चाच होणार ! जय श्री राम ! मुंबई ❤️ महादेव, असे नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनीही यावर भाष्य केले.
आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला
मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल, हा आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला. ज्यांना मराठी मुस्लिम महापौर करायचा होता त्यांचा डाव मुंबईकरांनीच हाणून पाडला. त्यामुळे भाजपा-शिवसेना रिपाई महायुतीच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या तमाम मुंबईकरांचे आभार !! महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे यांना शुभेच्छा !! मुंबईच्या विकासाचे नवे पर्व सुरु... आम्ही मुंबई विकासाबाबत सदैव लक्ष ठेवून राहूच. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार !!, असे आशिष शेलार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष आहे. पक्ष जो निर्णय घेतो, तो आम्हाला मान्य असतो. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. सर्वांचे आभार मानते. मुंबईची महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेक निवडून आले आहेत. सभागृहाची गौरव कायम ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी निर्मळ आणि प्रामाणिक काम करावे अशी माझी अपेक्षा आहे, अशी पहिली प्रतिक्रिया रितू तावडे यांनी दिली.
बोललो होतो..
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 7, 2026
मुंबई चा महापौर..
हिंदू होणार
मराठी होणार
महायुती चाच होणार !
जय श्री राम !
मुंबई ❤️ महादेव