कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:00 IST2025-12-24T11:59:36+5:302025-12-24T12:00:25+5:30
२५ वर्ष या शहराचा महापौर असताना तुमचे इथल्या अवस्थेकडे लक्ष दिले नाही. देवेंद्र फडणवीस सरकार २०१४ साली महाराष्ट्रात आले तेव्हापासून खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास झाला असं बावनकुळे यांनी सांगितले.

कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी जे विकासाचे मॉडेल लोकांसमोर मांडले त्याला लोकांचा प्रतिसाद आहे. नगरपालिका निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसले आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याचं काम फडणवीस यांनी केले. २०४७ पर्यंत मुंबई कशी असेल या आधारे विकसित मुंबईचा प्लॅन फडणवीस यांनी तयार केला आहे. त्यामुळे ५१ टक्के मते मुंबईकर महायुतीच्या बाजूने देतील आणि पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून भाजपाचा महापौर मुंबईवर बसेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेपूर्वी बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोण कुणाशी युती करते यावर मुंबईकर लक्ष देत नाहीत. मुंबईकर विकासाच्या बाजूने आहेत. जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे दुसरीकडे भकास आहे आणि आमच्याकडे विकास आहे. त्यामुळे कुणीही एकत्रित आले तरी त्यांना मते मिळणार नाही. तुमच्याकडे विकासाची भावना नाही. २५ वर्ष या शहराचा महापौर असताना तुमचे इथल्या अवस्थेकडे लक्ष दिले नाही. देवेंद्र फडणवीस सरकार २०१४ साली महाराष्ट्रात आले तेव्हापासून खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास झाला. जगातला कुठलाही व्यक्ती इथं आला तर त्याला बदललेला मुंबईचा चेहरा दिसतोय असं त्यांनी सांगितले.
तसेच मुंबई शहराला विकासाच्या दृष्टीने नेण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे. दोन्ही बंधू एकत्रित आले तरी काहीही फरक पडणार नाही. कितीही नेते एकत्र आले, गळाभेट घेतली तरी काही होणार नाही. जनता यांच्यापासून दूर गेली आहे. जनतेला यांची नौटंकी कळली आहे. किती भाषणातून नौटंकी केली तरी जनता विश्वास ठेवणार नाही. फक्त विकासाचे व्हिजन मांडावे लागेल अशी टीकाही बावनकुळे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
दरम्यान, महायुतीत बैठक सुरू आहे. आमच्यात कुठेही वाद नाही. महाराष्ट्रात सगळीकडे युती होणार आहे. बंडखोरी करणारा भाजपा-शिवसेनेचा कार्यकर्ता नाही. कुठल्याही परिस्थिती बंडखोरी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आमचा कार्यकर्ता समजूतदार आहे त्यामुळं बंडखोरी होणार नाही असंही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.