विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही? राहुल नार्वेकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 18:52 IST2024-12-08T18:49:30+5:302024-12-08T18:52:49+5:30
Maharashtra Politics: लोकसभेला ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडणुका झाल्या. त्यावेळेस कुणीही कसलीही तक्रार केली नाही. राजीनामे दिले नाहीत, असे सांगत राहुल नार्वेकर यांनी विरोधकांवर टीका केली.

विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही? राहुल नार्वेकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले...
Maharashtra Politics: लोकशाहीवर विश्वास नाही, म्हणूनच ईव्हीएमविरोधात विरोधक आंदोलन करत आहेत. लोकसभेला ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडणुका झाल्या. त्यावेळेस कुणीही कसलीही तक्रार केली नाही. राजीनामे दिले नाहीत. आत्ता अचानक आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा कौल आला की, त्याचे खापर निवडणूक आयोगावर फोडायचे. हा केविलवाणा प्रकार सातत्याने विरोधकांकडून होत आहे. मला असे वाटते की, येणाऱ्या काळात आपण संविधानिक संस्थानांवर असे आरोप न करता त्यांवर विश्वास ठेवून संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या आणि जनतेने दिलेला कौल आहे, त्याचा अवमान होऊ नये, याची काळजी सातत्याने घेणे आवश्यक आहे, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून कुणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने नार्वेकर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नार्वेकरांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, असे सांगितले जात आहे. यानंतर राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही?
विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा आणि त्यासंदर्भातील पात्रतेचे निकष काय असावेत, याचे सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांचे असतात. विधानसभा अध्यक्ष अशा प्रकारचे निर्णय घेतात, तेव्हा जुने दाखले, नोंदी, नियमांतील तरतुदी, संविधानात असलेल्या तरतुदींचा विचार केला जातो. मी अद्याप विधानसभेचा अध्यक्ष झालेलो नाही. परंतु, विधानसभा अध्यक्ष झाल्यावर माझ्यासमोर अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यास त्यावर योग्य पद्धतीने विचार करून निर्णय घेऊ, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, २८८ आमदारांना न्याय दिला नाही तर जनतेबरोबर अन्याय होतोय असे वाटेल. संसदीय लोकशाहीसाठी सर्वांना न्याय देणे फार महत्त्वाचे असते. माझ्या कार्यकाळात सर्वाधिक लक्षवेधी मांडल्या गेल्या. अडीच वर्षात सकारात्मक काम झाले आणि त्यादृष्टीने पुढील ५ वर्ष प्रयत्न असेल. नवीन विधान भवनासंदर्भात निर्णय विचाराधीन आहे. कुठल्याही गोष्टीची जबाबदारी दिली जाते तेव्हा मेरीटवर दिली जाते आणि त्यातून माझी निवड झाली आहे, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.