'कोरोना अनिल देशमुखांना झाला आहे की त्यांच्या मेंदूला?'; भाजपाची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 07:43 PM2021-02-08T19:43:48+5:302021-02-08T19:44:49+5:30

भारताचे भूषण असलेल्या मान्यवरांच्या विरोधात काहीही कारण नसताना कारवाई करण्याचा कट चालविला आहे, असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे.

BJP MLA Atul Bhatkhalkar has criticized state Home Minister Anil Deshmukh | 'कोरोना अनिल देशमुखांना झाला आहे की त्यांच्या मेंदूला?'; भाजपाची बोचरी टीका

'कोरोना अनिल देशमुखांना झाला आहे की त्यांच्या मेंदूला?'; भाजपाची बोचरी टीका

googlenewsNext

मुंबई : देशाचे भूषण असलेल्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर आणि क्रिकेटचा देव असलेल्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी देशहितासाठी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश देणाऱ्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे हे विधान ऐकून 'कोरोना त्यांना झालाय की त्यांच्या मेंदूला झालाय' असा प्रश्न पडतो अशी जळजळीत टीका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या  देशाशी काहीही संबंध नसलेल्या रिहाना, ग्रेटा, मिया खलिफा अशा पाश्चिमात्य 'नटींनी' भारत देशाविरोधात गरळ ओकण्यास सुरू केली होती. त्यांच्या या कृत्याच्या विरोधात कडक व खणखणीत उत्तर देणारे ट्विट लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार यांसह शेकडो भारतीय सेलेब्रिटीनी केले. मुळात आपल्या देशाच्या विरोधात कोणी गरळ ओकत असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई करायची सोडून राज्याच्या गृहमंत्र्यांनी मत्सर व द्वेषापोटी भारताचे भूषण असलेल्या मान्यवरांच्या विरोधात काहीही कारण नसताना कारवाई करण्याचा कट चालविला आहे, असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे.

राज्यातील निवडणुकीच्या काळात झालेल्या फोन टॅपिंगचे प्रकरण असो किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे ड्रग्स कनेक्शन शोधून काढणे असो, या गृहमंत्र्यांनी मागील वर्षभरात अनेक प्रकरणात चौकशी करणार असल्याच्या पोकळ धमक्या देण्याचेच काम केले असल्याची टीका सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याची शक्यता-

आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटींच्या ट्वीटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचे कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली होती. 

यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, ही बाब गंभीर आहे. त्याचा तपास झाला पाहिजे. याबाबतची जबाबदारी गुप्तचर खात्याला दिली आहे. तसंच, सर्व सेलिब्रिटींचे ट्वीट एकसारखे कसे काय असू शकतात. त्यांच्यावर कुठला दबाव होता का? असा सवालही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुखांना कोरोनाची लागण-

अनिल देशमुख हे कोराना पाॅझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी त्यांनी ट्विटरहून जाहीर केले. संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. प्रकृती उत्तम असून लवकरच कोरानावर मात करून जनसेवेत रुजू होणार असल्याचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.

Web Title: BJP MLA Atul Bhatkhalkar has criticized state Home Minister Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.