"काँग्रेसच्या थोरातांची चिंता, पण कडवट शिवसैनिकांना विचारायचंही नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 14:37 IST2020-06-22T14:08:23+5:302020-06-22T14:37:57+5:30
भाजपाचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

"काँग्रेसच्या थोरातांची चिंता, पण कडवट शिवसैनिकांना विचारायचंही नाही"
मुंबई: महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या कथित नाराजीवरून सध्या काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सध्या भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटलांच्या निशाण्यावर आहेत.
'मातोश्री' निवासस्थानी गेल्याबद्दल विखेंनी थोरातांना लाचार म्हणून हिणवले आहे. थोरातांनीही विखेंना जशास तसं उत्तर दिलं आहे. या दोघांच्या वादात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून राधाकृष्ण विखे-पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे भाजपाचे नेते नारायण राणेंवर देखील अप्रत्यक्षपणे टोला लगावण्यात आला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, सामनाचं आमच्यावर प्रेम आहे आणि असणारच शेवटी Old is gold. परंतु काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता आहे. मात्र ग्रामीण भागतल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. तसेच माझ्याकडे काही पत्र आहे. ते पत्र तळकोकणच्या प्रहारमधून लवकरच छापतो, मग बघु कशी कुरकुर होते, असा टोला देखील नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
सामना च आमच्यावर प्रेम आहे..असणारच..का नाही असणार शेवटी Old is gold!
— nitesh rane (@NiteshNRane) June 22, 2020
पण..काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायच पण नाही..
काही "पत्र"आहेत माझ्या कडे..तळकोकणच्या प्रहार मधुन लवकरच छापतो..
मग बघु कशी कुरकुर होते 😊
'सामना'च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत..
— nitesh rane (@NiteshNRane) June 22, 2020
पवारांना भेटले कि फडणवीसांबद्दल उलट बोलायच..
राणेंना भेटले कि ठाकरेंबद्दल उलट बोलायच..
ठाकरेंना राणें बद्दल उलट बोलायच..
राज्यपाल भेटले कि पवारांबद्दल उलट बोलायच..
अस करून स्वतःची किंमत संपवली!
ना भावाला मंत्री,ना स्वतः संपादक!
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात-
संकटकाळात सगळ्यात जास्त काम हे विरोधी पक्षालाच असते. राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत.
विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते तर आज ते सरकारात काँग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली. कोलांटउडीचे डोंबारी राजकारण प्रत्येकवेळी चालतेच असे नाही. विखे-पाटील यांनी भाजपवर काय काय मळीच्या गुळण्या टाकल्या आहेत हे त्यांनीच एकदा आठवून पाहावे.
फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली असूनही त्यांची टुरटुर सुरू आहे.
काय आहे थोरात- विखे प्रकरण-
विधान परिषद जागा वाटप आणि राज्य कारभारात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत उघड उघड नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सरकारच्या कामकाजाबाबत आमची कसलीही नाराजी नसून महाविकास आघाडी भक्कम आहे. हे सरकार पाच वर्ष चांगले काम करेल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला होता. बाळासाहेब थोरात यांच्या या विधानावर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती.
सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना आणि मंत्र्यांना कोणीही विचारत नाही. परंतु तरीदेखील काँग्रेस सत्तेसाठी सरकारमध्ये आहे. त्यामुळे मी एवढी वर्ष काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष कधीच पाहिले नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्याचप्रमाणे एवढा अपमान होऊनही काँग्रेस सत्ता सोडेल, अशी अपेक्षा यांच्याकडून करता येणार नाही असं मत देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेवर बाळासाहेब थोरात यांनी देखील पलटवार केला आहे. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या पाच वर्षात कसे वागले. हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना मी त्यांना पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेला शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.