‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:37 IST2025-08-20T10:36:34+5:302025-08-20T10:37:17+5:30

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता होती. परंतु, यंदाचा बेस्ट पतपेढी निवडणुकीचा अकल्पनीय निकाल लागला.

bjp keshav upadhye slams raj thackeray and uddhav thackeray after thackeray brand yuti defeat in best employees cooperative credit society election 2025 result | ‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला

‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अपेक्षित निकाल लागला. बेस्टच्या कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते. मात्र या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला एकही जागा मिळालेले नाही. शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक १४ उमेदवार निवडून आले. तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले. यानंतर आता भाजपा नेत्यांनी ठाकरे बंधूंवर टीक केली आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता होती. मात्र, आता शशांक राव यांच्या पॅनेलची सत्ता आली आहे. प्रसाद लाड यांनी सोशल मिडिया पोस्टवरुन ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. जागा दाखवली म्हणत प्रसाद लाड यांनी ही पोस्ट केली आहे. “बेस्ट इलेक्शन मध्ये ‘ठाकरे ब्रँड’ २१ समोर ००० ००/२१ म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत”, असे प्रसाद लाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत ठाकरे बंधूंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल?… या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणूक निकालाकडे पाहा! कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे!!, असे उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, आमदार प्रसाद लाड हे या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. तर, ठाकरे गट आणि मनसेने एकत्र येऊन पॅनल तयार केल्यामुळे ही निवडणूक ठाकरे बंधुंच्या नावासाठी प्रतिष्ठेची झाली होती. अगदी शेवटच्या दिवशी शिवसेनेने आपली सगळी यंत्रणा, विभागप्रमुख, नगरसेवक कामाला लावले होते. असे असले तरी शशांक राव यांच्या पॅनलने बाजी मारल्यामुळे बेस्टच्या पतपेढीची ही निवडणूक चांगलीच गाजली.

Web Title: bjp keshav upadhye slams raj thackeray and uddhav thackeray after thackeray brand yuti defeat in best employees cooperative credit society election 2025 result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.