"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:51 IST2025-11-03T15:48:58+5:302025-11-03T15:51:27+5:30
Sandeep Deshpande on Ashish Shelar: विरोधी पक्षांनी काढलेल्या सत्याचा मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या यादीचा ढीग दाखवला. त्यात सगळे हिंदू मतदार होते, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला. त्याला मनसेचे संदीप देशपांडेंनी उत्तर दिले.

"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
Maharashtra Bogus Voter Raj Thackeray: "आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता का गंज लागला मला माहिती नाही. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल. कारण सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगलं मंत्रीपद दिलं नाही, कदाचित त्यामुळे असेल", असा शब्दात डिवचत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवार केला.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंकडून करण्यात आलेल्या दुबार मतदारांच्या यादीवर टीका केली. ज्या याद्या दाखवल्या ते मतदार हिंदूच होते, असे शेलार म्हणाले. त्यावर मनसेचेसंदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले.
'शेलारांना भाजपमध्ये कुणी विचारत नाही'
"आशिष शेलार यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. एकतर सध्या भाजपमध्ये शेलारांना कुणी विचारत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे खातं दिलं आहे, त्या खात्यात दम नाही. त्यामुळे त्याचं जे वजन असायला हवं ते नाही. मुंबई प्रदेशाध्यक्ष पदही गमावलं आहे. तिथेही कुणी विचारत नाही. त्यामुळे आपण चर्चेत राहिलो पाहिजे या उद्देशाने आजची त्यांची पत्रकार परिषद होती", अशी टीका शेलारांवर देशपांडे केली.
शेलारांना मनसेचे प्रश्न
"आशिष शेलारांनी ज्या पद्धतीने मांडलं की, जो गठ्ठा दाखवला. फक्त हिंदू मतदारच दुबार दाखवले. तो गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का? हिंदू मतदार आहेत की, मुस्लीम मतदार आहेत. ख्रिश्चन मतदार आहेत की, जैन मतदार आहेत, हे बघायला आशिष शेलार तिकडे आलेले का? आशिष शेलारांना हे कुणी सांगितलं की त्यात फक्त हिंदू मतदारच आहेत. आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच. मग तो ना हिंदू आहे, ना मुस्लीम, ना शीख, ना ख्रिश्नन", अशी टीका संदीप देशपांडेंनी केली.
दुबार मतदार आहेत, याच्याशी शेलार सहमत
"आशिष शेलार ज्या पद्धतीने बावचळले आहेत, जो प्रचंड मोर्चा झाला. त्या मोर्चामुळे भाजप घाबरलेला आहे. त्यामुळे शेलार पुढे आले आहेत. मूळात ते या गोष्टीशी सहमत आहे की, दुबार मतदार आहे. मग आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील, तर ते बाद झाले पाहिजेत. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. या मागणीशी शेलार सहमत आहेत का, ते त्यांनी सांगावं", असा उलट सवाल त्यांनी केला.
'शेलारांच्या बुद्धीला गंज लागलाय, कारण...'
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता का गंज लागला मला माहिती नाही. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल. कारण सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगलं मंत्रीपद दिलं नाही, कदाचित त्यामुळे असेल. माझा आशिष शेलारांना प्रश्न आहे की, जी यादी आम्ही दुबार मतदारांची दाखवली, त्यात हिंदूच मतदार आहेत, आणि दुसरे नाहीत, हे शेलार कशाच्या आधारावर बोलत आहेत?", असे संदीप देशपांडे म्हणाले.