पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
By संतोष कनमुसे | Updated: November 6, 2025 17:23 IST2025-11-06T17:09:47+5:302025-11-06T17:23:28+5:30
मुंबईतील वरळी डोम येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रश्न केले.

पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणावरुन राज्यातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर विरोधी पक्षांनी चौकशी करुन कारवाईची मागणी केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले असून काही अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर बोलणे टाळले आहे.
मुंबईतील वरळी डोम येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रश्न केले, यावेळी पवार यांनी माध्यमांसोबत बोलणे टाळले. माध्यमांचे बूम बाजूला करत अजित पवार न बोलताच निघून गेले. अजित पवार नेहमी माध्यमांसोबक संवाद साधत असतात. पण, आज त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारासंदर्भात आरोप करण्यात आले आहे. या प्रकरणी विरोधकांनी आरोप केले आहेत.
पार्थ पवार यांच्यावर आरोप काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेलीजमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी नियम वाकवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे महसूल विभागाकडून विशेष सवलत देण्यात आलीय का असा सवाल विरोधकांनी विचारला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले
"या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड असतील या संदर्भातील सगळी माहिती मागवली आहे. याप्रकरणी योग्य ते चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ही सगळी माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर आहे. जे सांगायचे ते सांगणार आहे. माझ्याकडे अद्याप पूर्ण माहिती आलेली नाही. जे मुद्दे समोर आलेत ते गंभीर आहेत त्यामुळे त्याची योग्य प्रकारे माहिती घेऊनच बोललं पाहिजे. त्या दृष्टीने ही माहिती आज माझ्याकडे येणार आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.