आक्रमक काँग्रेसमुळे प्रचारात रंगत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 05:45 AM2019-04-21T05:45:59+5:302019-04-21T05:47:20+5:30

प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कडवी झुंज पाहायला मिळते आहे.

Aggressive Congress campaign | आक्रमक काँग्रेसमुळे प्रचारात रंगत

आक्रमक काँग्रेसमुळे प्रचारात रंगत

Next

- गौरीशंकर घाळे
आवाज कोणाचा...? ही शिवसेनेची हुकमत सांगणारी गर्जना एके काळी मुंबईतील राजकारणाची ओळख होती. जसजसा मुंबईचा भाषक तोंडवळा बदलत गेला, तशी ही गर्जनाही बददली. मागील विधानसभा निवडणुकीत धाकट्या भाजपने स्वबळावर एक आमदार जास्त निवडून आणत, थोरल्या-धाकट्याचे समीकरणच बदलून टाकले. विखुरलेला मराठी, एकवटलेली उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी मते आणि एकगठ्ठा मुस्लीम मतांनी मुंबईचा राजकीय चेहरामोहरा पार बदलून टाकला. मतदारांमधील हा बदल शिवसेनेला अद्याप मनापासून स्वीकारता आलेला नाही. भाजपने तो नेमका स्वीकारला. मनसेनेही त्याची दखल घेतली. भाजपचे सध्याचे राजकारण ही कधी काळी काँग्रेसची ओळख होती. सर्व समाजघटकांना नेतृत्व देण्याची प्रथा जशी काँग्रेसने मोडली, तशी मुंबईत काँग्रेसची पीछेहाट सुरू झाली. राजकारणाचा हा बदललेला पोत, युती विरुद्ध आघाडीच्या लढतीत मनसेने घेतलेली भूमिका, उत्तर भारतीय मतदारांची विसविशीत झालेली एकगठ्ठा वीण या पार्श्वभूमीवर मुंबईच्या रणसंग्रामाचा लेखाजोखा...

बदलतोय राजकीय नूर
मागील दोन लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिले. २००९ साली आघाडीला, तर २०१४ ला युतीला. आधी मनसे नंतर मोदी लाट... या निकालाचे दृश्य कारण ठरले. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने वाटत असलेले मुंबईचे राजकीय चित्र पालटत आहे. प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कडवी झुंज पाहायला मिळते आहे.

दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोदी हटाव मोहिमेने युतीची डोकेदुखी भलतीच वाढली आहे. ज्या ‘मोदी’ नावाच्या खांबावर भाजपचा सारा भार आहे, त्यावरच हल्ले होत आहेत. मोदींचीच जुनी-नवी भाषणे दाखवत राज यांनी अचूक मारा सुरू केला आहे. त्याला सध्यातरी भाजपकडे उत्तर नाही. प्रत्येक सभेनंतर सोशल मीडियावर रंगणाऱ्या या युद्धात भाजप अक्षरश: मेटाकुटीला आल्याचे चित्र आहे. सोशल मीडियातील राजकीय चर्चेचा अजेंडा सध्या तरी राज ठाकरेच सेट करत असल्याचे चित्र आहे. राज यांच्या या ‘मोदी हटाव’ मोहिमेचा सर्वाधिक परिणाम मुंबईच्या मतदारसंघांतील समीकरणांवर होण्याची शक्यता आहे. गटबाजीमुळे परिणामशून्य झालेली काँग्रेस काहीशी सावरली आहे. संजय निरुपम यांच्या काळात मुंबई काँग्रेसमधील अनेक नेते बाजूला फेकले गेले होते. जनाधार असलेले नेतेच बाजूला राहिल्याने सारेच मुसळ केरात, अशी मुंबई विभागीय काँग्रेसची गत होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘निरुपम हटाव’ची मागणी हायकमांडला मान्य करावी लागली. मिलिंद देवरांच्या हाती कारभार आला. देवरा हे निरुपम यांच्याप्रमाणे आक्रमक नाहीत. मात्र, निरुपमांच्या गच्छंतीमुळे बाजूला फेकले गेलेले नेते, निष्क्रिय पदाधिकारी आपापल्या भागात सक्रिय झाले.

परिणामी, युती आणि आघाडीतील विषम वाटणारी लढाई प्रचाराच्या दुसºया टप्प्यात सम पातळीवर आली. या बदलत्या वातावरणात पक्ष संघटन आणि मोदी फॅक्टरवरच भाजपची सारी मदार आहे. शेवटच्या टप्प्यातील मोदींच्या सभेने मुंबईतील वातावरण बदलेल, असा भाजप नेत्यांना विश्वास आहे. मोदींच्या सभा आणि संघटनात्मक ताकद विरोधकांसाठी ‘भीमटोला’ ठरेल, असा भाजप नेत्यांचा ठाम विश्वास आहे. यात झाकोळली गेली आहे, ती शिवसेना. मनसेला उत्तर देता येत नाही आणि आधी टीकास्त्र सोडलेल्या भाजपशी केलेली युती योग्य असल्याचे सांगण्यात त्यांची ताकद खर्ची होते आहे.

ऊर्मिला क्रेझच्या, तर भाजप संघटनेच्या भरवशावर
भाजपला एकतर्फी वाटणारी उत्तर मुंबईतील लढत ऊर्मिला मातोंडकरांमुळे चुरशीची बनली. आधीच सेलिब्रेटी असल्याची क्रेझ, त्यात मुद्द्यांची सुस्पष्ट मांडणी, अवघड प्रश्नांनाही थेट भिडणाºया ऊर्मिला यांनी सर्वांनाच चकीत केले. त्यांना मिळणाºया प्रतिसादामुळे काँग्रेसजनही भलतेच आक्रमक झाले आहेत. मात्र, पूर्वी सेलिब्रिटी गोविंदाचा फटका खाल्लेली भाजप यंदा भलतीच सावध आहे. केलेली कामे आणि मजबूत संघटनेच्या जोरावर गड राखायचा, अशी सध्या त्या पक्षाची रणनीती आहे.

निरुपम यांची एकाकी झुंज
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे संजय निरुपम विरुद्ध शिवसेनेचे गजानन कीर्र्तिकर अशी थेट लढत आहे. दुखावलेले भाजपजन कीर्तिकरांसाठी किती राबतील, हा प्रश्न निकाली निघाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे गणित बांधून स्थानिक भाजप नेते कामाला लागले आहेत. दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजी, बदलून घेतलेला मतदारसंघ यामुळे निरुपम एकाकी लढत देत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर गेलेले पक्षाचे अध्यक्षपद हाही त्यांच्या विरोधकांच्या हाती असलेला मुद्दा. या मतदारसंघातील एकगठ्ठा मुस्लीम मते आणि आक्रमकतेने लढणे हीच त्यांची जमेची बाजू आहे.

पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त लढतीकडे सर्वांचे लक्ष
उत्तर मुंबईत काँग्रेसच्या प्रिया दत्त विरुद्ध भाजपच्या पूनम महाजन यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. या दोन्ही उमेदवारांनी गेल्या पाच वर्षांत मतदारांशी फारसा संपर्क न ठेवल्याचा आक्षेप घेतला गेला. दत्त यांच्या तुलनेत महाजनांची प्रचार यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. मात्र, प्रमोद महाजन आणि सुनील दत्त या दोघा दिवंगत दिग्गजांच्या लेकींची लढत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

राष्ट्रवादीची मनसेवर भिस्त
मुंबईत राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला एकमेव मतदारसंघ म्हणजे उत्तर पूर्व. राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मनोज कोटक अशी येथे लढत आहे. किरीट सोमय्यांचा पत्ता कापल्याने आधी दुखावलेली मराठी आणि उत्तर भारतीयांची मते यावेळी पुन्हा मिळतील आणि गुजराती, मारवाडी समाजाची पारंपरिक मतेही मिळतील, या गणितावर भाजपची भिस्त आहे. तर आघाडीच्या पारंपरिक मतांना मनसेची जोड मिळेल, असा राष्ट्रवादीला विश्वास आहे. २००९ च्या चुरशीच्या लढतीत संजय दिना पाटील विजयी झाले होते. यंदा राज ठाकरेंच्या झंझावाती सभांमुळे ते पुन्हा एकदा तोच परिणाम साधतील का, याबाबत उत्सुकता आहे.

देवरांसाठी उद्योजक रिंगणात
दक्षिण मुंबईत काँग्रेसचे मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत अशी लढत आहे. गुजराती, मारवाडी कार्ड खेळतानाच मनसेच्या माध्यमातून मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. मुकेश अंबानी, उदय कोटक आदी उद्योजकांनी देवरा यांना पाठिंबा दिला आहे, तर तीन लाखांच्या आसपास असलेली मुस्लीम मते ही जमेची बाजू असल्याचे काँग्रेस नेते मानतात. शिवसेनेची हक्काची दोन लाख मते अबाधित राखण्याचे सावंत यांचे प्रयत्न आहेत. शिवाय, स्थानिक उमेदवारापेक्षाही मोदींना पुन्हा निवडून देण्यासाठी गुजराती, मारवाडी मते शिवसेनेकडे वळावीत, यासाठी स्थानिक भाजप नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. उच्चभ्रूंसोबत मध्यमवर्गीय भाडेकरूंचा निर्णय येथे महत्त्वाचा आहे.

दलित, मुस्लिमांकडे लक्ष
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध
काँग्रेसचे एकनाथ गायकवाड अशी लढत आहे. दलित, मुस्लीम मतांची लक्षणीय संख्या ही येथे काँग्रेससाठी जमेची बाजू मानली जाते. जोडीला यंदा मनसेही काँग्रेसच्या बाजूने प्रचारात आहे. मात्र, ही ताकद प्रत्यक्ष मतपेटीपर्यंत नेण्यासाठीची यंत्रणा पक्षातर्फे किती प्रभावीपणे राबविली जाईल, यावरच राजकीय चित्र अवलंबून आहे. शिवसेना-भाजप जोरकसपणे मैदानात उतरल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसैनिकांचा विरोध डावलून कालिदास कोळंबकरांना भाजपतर्फे प्रचारात उतरविण्याचा नेमका काय परिणाम होतो, तेही निकालानंतर स्पष्ट होईल.

कोणत्या प्रश्नांभोवती फिरतेय निवडणूक?
मोदी सरकारने प्रत्येकाला घराचे आश्वासन दिले. त्यासाठी २०२२चा वायदा असला, तरी मुंबईत हे उद्दिष्ट गाठण्याचे विशेष प्रयत्न दिसत नाहीत. सध्या आहेत त्याच प्रकल्पांतील घरे या योजनेखाली दाखविली जात आहेत.
मुंबईला स्मार्ट शहर बनविण्याचे स्वप्न पुन्हा एकदा दाखविण्यात आले, पण त्यासाठी हवी तशी तरतूद झाली नाही. तोच प्रश्न शहर स्वच्छतेचा. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांवर देशाच्या तुलनेत शहर पिछाडीवर गेले.
रेल्वे वाहतूक हा मुंबईचा सर्वात मोठा प्रश्न. उपनगरी वाहतुकीत न झालेली लक्षणीय सुधारणा, मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाचे रखडलेले टप्पे आणि त्यामुळे प्रवाशांतील नाराजी हा मुद्दा मुंबईच्या प्रत्येक मतदारसंघात भेडसावतो.
नोटाबंदीचा फटका बसल्यानंतर धारावीतील लघू आणि मध्यम उद्योजकांचे कंबरडे मोडले. त्यातच तेथील पुनर्विकासाचा प्रश्न सुटलेला नाही, शिवाय गोवंश हत्याबंदीचा फटकाही येथील चर्म उद्योगाला बसला आहे.
भायखळा, कुर्ला, वांद्रे, चांदिवली, गोवंडी यासारख्या मुस्लीमबहुल भागात मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. शिवाय तिहेरी तलाकसह, गोरक्षणासारख्या विविध विषयांमुळे मुस्लिमांत असलेली अस्वस्थता प्रचारात दिसून येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रखडलेले स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे फक्त भूमिपूजन पार पडल्याचा मुद्दाही जाहीर सभांत उपस्थित होतो. या स्मारकांच्या नंतर घोषणा होऊनही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकासाठी निधी देऊन ते
पूर्ण करत मुंबईसह महाराष्ट्रावर या बाबतीतही कसा अन्याय केला जातो, हा मुद्दा प्रकर्षाने मांडला जातो.
मोडकळीस आलेल्या घरांचे प्रश्न, झोपडपट्टी पुनर्विकासाचे त्रांगडे, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, यामुळे विविध भागातील रहिवासी त्रस्त आहेत, शिवाय मालमत्ता करातील दिलाशाचा मुद्दाही श्रेयवाद घेत समोर येतो.
जीएसटी आणि नोटाबंदीमुळे व्यापारी, व्यावसायिकांना नक्कीच फटका बसला. मात्र, विरोधक सांगतात तितकी नाराजी या मुद्द्यावर उमटताना दिसत नाही. सुवर्णकारांचे प्रश्नही थेट प्रचारात आलेले नाहीत.
माहुलच्या रहिवाशांनी विरोध केल्यामुळे मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्नही प्रचारात आला. मात्र, त्यावर उपाय हाती नसल्याने त्यावर कोणताही उमेदवार भूमिका घेत नाही.
मेट्रोमुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा चेहरा बदलेल असा दावा सुरू आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास यायचे आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी होणारी कोंडी हा मात्र नव्याने निर्माण झालेला प्रश्न आहे.

Web Title: Aggressive Congress campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.