बीकेसीत ९० मीटर उंचीच्या इमारती ?

By Admin | Updated: June 9, 2015 03:52 IST2015-06-09T03:52:07+5:302015-06-09T03:52:07+5:30

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात ९० मीटर व वडाळा परिसरात २२५ मीटर उंचीच्या इमारतींना भारतीय विमान प्राधिकरणाने परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

9km height of buildings in BKC? | बीकेसीत ९० मीटर उंचीच्या इमारती ?

बीकेसीत ९० मीटर उंचीच्या इमारती ?

नवी दिल्ली : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात ९० मीटर व वडाळा परिसरात २२५ मीटर उंचीच्या इमारतींना भारतीय विमान प्राधिकरणाने परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री अशोक गजपती राजू पुसापती यांच्याकडे केली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भारतीय विमान प्राधिकरणाकडे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स व वडाळा परिसरातील इमारतींची उंची वाढविण्यासंदर्भात यापूर्वीच विनंती केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक गजपती राजू पुसापती यांची भेट घेऊन बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स व वडाळा परिसरातील इमारतींच्या उंचीसंदर्भात व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. भारतीय विमान प्राधिकरणाने बांद्रा-कुर्ला परिसरात ५१.७५ ते ६१.४५ मीटर व वडाळा परिसरात १३६-१५ ते १५४.४१ मीटर उंचीच्या इमारती असाव्यात असे
सूचित केले आहे. यावर अशोक गजपती राजू यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स व वडाळा परिसरातील इमारतींच्या उंचीच्या प्रश्नासंदर्भात अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
राज्य शासन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाच्या उभारणी बाबत कटिबद्ध आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा आढावा वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाच्या ‘प्रगती’ या उपक्रमांतर्गत घेतला जातो. या विमानतळाच्या भूसंपादनासाठी लागणारी निधी व नियम याची देखरेख सिडकोच्या माध्यमातून राज्य शासन करीत आहे. केंद्र शासनाने या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सेवाकर, सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आदींबाबत सूट द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 9km height of buildings in BKC?