‘जलयुक्त’ची २०० कामे रखडली

By Admin | Updated: June 1, 2015 22:25 IST2015-06-01T22:25:33+5:302015-06-01T22:25:33+5:30

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांसाठी ई-टेंडर काढूनही ठेकेदार सापडत नसल्याने कृषी विभागाने सुचविलेल्या दोन कोटी रुपयांच्या २०० कामांना

200 water works | ‘जलयुक्त’ची २०० कामे रखडली

‘जलयुक्त’ची २०० कामे रखडली

आविष्कार देसाई, अलिबाग
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांसाठी ई-टेंडर काढूनही ठेकेदार सापडत नसल्याने कृषी विभागाने सुचविलेल्या दोन कोटी रुपयांच्या २०० कामांना अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना पुरती खोळंबली असल्याचे दिसून येते.
जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील ४५ गावांचा समावेश केला आहे. यासाठी सुमारे ५३ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. सुमारे सात हजार कामांना मंजुरी देण्यात आली असून ८६२ कामे सुरु असून ८११ पूर्ण झाली आहेत.
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडविणे यासाठी मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करून पाणीपुरवठ्यात वाढ करणे, वृक्ष लागवड करणे यासह माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, गॉबियन बंधारा, वळण बंधारा अशी कामे करावयाची आहेत.
सिमेंट बंधारे, माती नाला बंधारे, कालव्यांची दुरुस्ती अशा दोन कोटी रुपयांच्या २०० विविध कामांसाठी ई-टेंडर काढण्यात आले होते. मात्र त्याला कोणत्याच ठेकेदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. प्रशासनाला ठेकेदार मिळत नसल्याने ही कामे रखडली आहेत. जानेवारी २०१५ रोजी जलयुक्त शिवार योजनेला प्रारंभ झाला असून जानेवारी २०१६ हा अंतिम कालावधी आहे. त्यामुळे सुरुवातीलाच जलयुक्त शिवार योजना अडकली असल्याने ठरावीक मुदतीत ती पूर्ण होणार का यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होण्यास अनेकदा विलंब होतो. परिणामी ठेकेदारांना वेळेवर बिले अदा करता येत नाही. त्यामुळेच जलयुक्तच्या कामासाठी ठेकेदार निरुत्साही दिसतात.

Web Title: 200 water works