थर्टी फर्स्टसाठी १५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:29 IST2024-12-31T10:29:11+5:302024-12-31T10:29:30+5:30

शहरातील हॉटेल्स, पब्ज, मॉल्स आणि चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव १५ हजार पोलिस आणि अंमलदार शहरात तैनात आहेत...

15,000 police personnel deployed for Thirty-First | थर्टी फर्स्टसाठी १५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

थर्टी फर्स्टसाठी १५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना, त्यांच्या संरक्षणासाठी १५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच थर्टीफर्स्ट निमित्ताने चालणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्याबरोबर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’च्या विरोधात पोलिस विशेष मोहीम राबविणार आहेत. त्यानुसार, नाकाबंदी आणि झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. 

शहरातील हॉटेल्स, पब्ज, मॉल्स आणि चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव १५ हजार पोलिस आणि अंमलदार शहरात तैनात आहेत. त्यांच्या बरोबरच सशस्त्र दल, राज्य राखीव दल, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके, दंगल नियंत्रक पथके, शीघ्र कृती दल आणि फोर्सवन आदी विशेष पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी आहे.

गेट वे ऑफ इंडियासह गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, आक्सा, मढ, मार्वे, गोराई या चौपाट्या आणि पवई तलाव आदी ठिकाणी पोलिस उपायुक्तांच्या निगराणीखाली विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबई पोलिस आयुक्तालयातील सुसज्ज मुख्य नियंत्रण कक्षातून शहरातील बारीक-सारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. 

सागरी सुरक्षेवर विशेष लक्ष
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करणार असल्याने तेथे पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांनी समुद्रातील गस्तीमध्ये वाढ केली आहे. तसेच भारतीय तटरक्षक दल आणि नौसेनेकडूनही या काळात विशेष सागरी सुरक्षा कवच पुरवण्यात येणार आहे. 

ड्रग्ज तस्करीवर नजर 
नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या तरुणाईसाठी शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करण्यात येईल, या शक्यतेतून मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने कंबर कसली आहे. या पथकांनी शहरातील ड्रग्ज विक्रेत्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली असून हॉटेल्स, पब्ज, नाइट क्लब, लाऊंज, तसेच फ्लॅट, बंगले, रिसॉर्टवरील पार्ट्यांवरही लक्ष ठेवण्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय केले आहे.

किती फौजफाटा तैनात?
- मुंबई पोलिस दलाकडून वाहतूक विभागासह आठ अपर पोलिस आयुक्त, २९ पोलिस उपआयुक्त, ५३ सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह २१८४ पोलिस अधिकारी आणि १२०४८ पोलिस अंमलदार असा बंदोबस्त तैनात. 
- पोलिसांबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या प्लाटून, क्यूआरटी टीम, बीडीडीएस टीम, आरसीपी प्लाटून, होमगार्ड्स तैनात. 

छेडछाड केल्यास कठोर कारवाई 
-    थर्टीफर्स्टच्या रात्री महिलांच्या छेडछाडीबाबत दक्षता 
-    शहरात गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात
 

Web Title: 15,000 police personnel deployed for Thirty-First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.