महायुतीत तणावाचे १० मतदारसंघ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, आता दिल्लीत होणार अंतिम निर्णय

By यदू जोशी | Published: March 16, 2024 06:05 AM2024-03-16T06:05:09+5:302024-03-16T06:08:13+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या असून, किमान १० मतदारसंघांमध्ये महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.

10 constituencies of tension in mahayuti for lok sabha election 2024 seat allotment formula stalled now final decision will be made in delhi | महायुतीत तणावाचे १० मतदारसंघ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, आता दिल्लीत होणार अंतिम निर्णय

महायुतीत तणावाचे १० मतदारसंघ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, आता दिल्लीत होणार अंतिम निर्णय

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील सत्तारुढ महायुतीचा लोकसभा जागावाटपाचा फाॅर्म्युला तब्बल १० जागांवर अडला आहे. त्यामुळे तीन पक्षांपैकी कोण किती आणि कोणत्या जागा लढविणार हे निश्चित होऊ शकलेले नाही. आता येत्या एकदोन दिवसांत दिल्लीत अंतिम फैसला होईल, अशी शक्यता आहे.

महायुतीचे ८०% जागावाटप ठरले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. हे लक्षात घेता जवळपास १० जागांबाबत फैसला होऊ शकलेला नाही हे एकप्रकारे फडणवीस यांनी मान्य केले. ‘लोकमत’च्या  माहितीनुसार, किमान १० मतदारसंघांमध्ये महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.

मनसेला सोबत घेण्याच्या हालचाली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. महायुतीत त्यांना सामावून घेताना दक्षिण मुंबईची जागा बाळा नांदगावकर यांना दिली जाऊ शकते. त्यांच्याबाबत शिर्डीचा विचार सुरू आहे. शिवसेनेचे खा.राहुल शेवाळे आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याची गुरुवारी रात्री मुंबईत भेट घेतली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपने उमेदवारी दिल्याचे चित्र असताना आता नवा ट्विस्ट येऊ घातला आहे. महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांचा उपयोग होईल असे गणित भाजपने मांडले आहे.

...तर भाजपच्या वाट्याला २९ जागा

१३ जागा तर आपल्याला मिळायलाच हव्यात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी सहापेक्षा कमी जागा घ्यायला तयार नाही. एकूण १९ जागा मित्रपक्षांना दिल्या तर भाजपच्या वाट्याला २९ जागा येतील. भाजपचे राज्यातील नेते त्यासाठी राजी नाहीत. त्यामुळे आता चेंडू भाजपश्रेष्ठींच्या कोर्टात गेला आहे. सूत्रांनी सांगितले की, शिवसेनेकडील दोन मतदारसंघात नवीन चेहरा द्यावा अशी सूचना भाजपने केली आहे. भाजपच्या बाबतीत राष्ट्रवादी व शिवसेनेकडून एकेका मतदारसंघाबाबत तशी सूचना करण्यात आली आहे.

या जागांचा आहे तिढा

- भंडारा-गोंदिया : भाजपला आणि राष्ट्रवादीलाही हवी
- सातारा : भाजप आणि राष्ट्रवादीची रस्सीखेच
- ठाणे : भाजपबरोबरच शिवसेनेलाही हवाय 
- रामटेक : भाजपला इच्छा, शिवसेनाही अडली
- यवतमाळ-वाशिम : भाजप म्हणतो आम्हाला द्या
- गडचिरोली : भाजपचा मतदारसंघ, राष्ट्रवादीचाही हट्ट
- उत्तर-पश्चिम मुंबई : शिवसेनेची जागा, भाजपचा दावा
- दक्षिण मुंबई : भाजप-सेनेत रस्सीखेच, मनसेची शक्यता
- औरंगाबाद : शिवसेना आग्रही व भाजपही अडून बसला
- कोल्हापूर : शिवसेना आणि भाजप या दोघांचाही दावा
 

Web Title: 10 constituencies of tension in mahayuti for lok sabha election 2024 seat allotment formula stalled now final decision will be made in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.