Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आज तुम्ही माझ्याबरोबर नाही आहात पण...'; श्वेता शिंदेची 'लागिर झालं जी'मधील जीजींसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 11:14 IST

Shweta Shinde : अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेची सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्ट आली चर्चेत

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) हिने अभिनयातच नाहीतर निर्मिती क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे. ‘लागिर झालं जी’ मालिकेची निर्मिती श्वेता शिंदेनेच केली होती. या मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'साता जल्माच्या गाठी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस 2' या मालिकांची निर्मितीही तिने केली. दरम्यान आता श्वेता शिंदे हिने एका साडीत फोटोशूट केले असून तिने ही साडी स्पेशल असल्याचे सांगितले आहे. या पोस्टमध्ये तिने ‘लागिर झालं जी’ मालिकेतील जीजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांच्याबद्दल लिहिले आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

श्वेता शिंदे हिने साडीतील फोटोशूट शेअर करत लिहिले की, आजची ही पोस्ट माझ्यासाठी खास आहे. त्यामागे कारणही तसंच आहे...लागिर झालं जी मधील आपल्या सर्वांच्या लाडक्या जीजींनी ही साडी मला गिफ्ट केली होती. ही साडी देताना त्या मला म्हणाल्या होत्या... "एकदा तरी नेसशील ना ही साडी?" मला ह्या साडीत पाहण्याची त्यांची खूप इच्छा होती. खरेतर ही साडी नेसून, छान तयार होऊन मला त्यांच्यबरोबरच फोटोज् काढायचे होते पण तो योग कधी आलाच नाही. त्यापूर्वीच जीजी आपल्याला सोडून गेल्या. पण त्यांनी दिलेली ही साडी आजही मला त्यांच्या मायेची ऊब देते. ही साडी जेव्हा मी नेसले तेव्हा सतत त्या माझ्या आजूबाजूलाच असल्याचा भास मला जाणवत होता. त्यांच्याकडे पाहिलं की नेहमी त्यांच्या डोळ्यात मला माझे कौतुकच दिसायचे. 

तिने पुढे लिहिले की, मी साताऱ्याची आणि त्या कऱ्हाडच्या असल्यामुळे त्यांना नेहमी माझ्याबद्दल एक वेगळाच अभिमान असायचा आणि दरवेळी त्या हे बोलूनही दाखवत. मी, ही साडी म्हणजे जीजींनी मला दिलेला आशीर्वाद आणि त्यांच्या माझ्यावरील अमाप प्रेमाची आठवण समजते. ती मी नक्कीच आयुष्यभर स्वतःकडे जपून ठेवणार आहे. "जीजी, आज तुम्ही इथे माझ्याबरोबर नाही आहात पण मी नक्कीच सांगू शकते की, तुम्ही जिथे कुठे असेल तिथुन मला पाहत असाल आणि या साडीत मला पाहून तुम्हालाही खूप आनंद होत असेल." Miss You Jiji

टॅग्स :श्वेता शिंदेलागिरं झालं जी