८ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला दिनानिमित्त अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही महिला दिनानिमित्त विचार करायला लावणारी पोस्ट लिहिली आहे.
अश्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती लाठीकाठी खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे.
अश्विनी महांगडेची पोस्ट
शुभेच्छा देणे गरजेचे असेल तर आधी वागण्यात बदल करावा लागेल. पण कोणी? तिने की तिच्या आजूबाजूच्या माणसांनी?
ती शिकली असेल, तिच्या गरजा जितक्या आहेत किमान तितके पैसे ती कमावत असेलही. पण म्हणून ती जिंकली असे होत नाही आणि पुढचे अनेक वर्ष ते होणार ही नाही.
तिच्यात नेतृत्व कौशल्य असेलही पण म्हणून तिने स्वतः च्या आयुष्याचे निर्णय बेधडकपणे घेणे हे ती नाही करू शकत.
ती चुकली हे तिने मान्य केले, तरी त्या चुकीबद्दल तिने सतत ऐकणे, मार खाणे हे किती नार्मल आहे.
तिने केलेली मेहनत दिसत असूनही समाज म्हणून भूमिका काय असायला हवी?तर रस्त्याने येता जाता तिला त्या नजरांची भीती वाटायला हवी, शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिक अत्याचार जितके आणि जसे करता येतील तितके करावे. नजरेला नजर भिडवून बोलण्याचा तिचा विश्वास मरून जावा..
मग उजाडेल एक दिवस #८मार्च #जागतिक_महिला_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा असे म्हणत तिचा दिवस सुंदर जावा… 🌸🦋
त्यानंतरचे सगळे दिवस तसे सारखेच की….
अन्याय सहन करणारा ही तेवढाच गुन्हेगार जेवढा अन्याय करणारा.तर मग आता तूच ठरव तुला गुन्हेगार व्हायचे आहे की नाही.. ?
बाकी शेवट तोच आणि अगदी तसाच…जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अश्विनीच्या या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. अश्विनी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'आई कुठे काय करते'मध्ये ती दिसली होती. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली.