Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस' मालिकेच्या तिसऱ्या सीझनची रंगलीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 11:04 IST

Devmanus: 'देवमाणूस' मालिकेचं दुसरं पर्व संपून १५ दिवस उलटले आहेत आणि आता या मालिकेचं तिसरं पर्व येणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' (Devmanus)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या पर्वाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.  नुकतेच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र अद्याप या मालिकेची प्रेक्षकांमधील क्रेझ संपली नाही. दरम्यान आता देवमाणूस मालिकेचे तिसरे पर्व लवकरच येणार अशी चर्चा सुरू आहे. 

गावात सुंदर महिला दिसली की तिच्यासमोर गोड गोड बोलून तिला जाळ्यात ओढायचे आणि खोट्या प्रेमात फसवायचे. तिला लग्नाचे आमिष दाखवायचे. तिचे दागिने, जमीन, पैसा लुटायचा आणि शेवटी तिचा खून करायचा. देवमाणूस बनून मुखवटा घालून फिरणारा अजित कुमार देव प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. देवमाणूस या मालिकेने पहिल्या भागात तर टीआरपीचे सगळे रेकॉर्ड तोडले होते. दुसरा भागही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला. आता या मालिकेविषयी नवी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे देवमाणूसचे चाहते खूप खूश झाले आहेत. 

देवमाणूस मालिकेचा पहिला भाग जेव्हा संपला तेव्हा डॉ अजितकुमार उर्फ देवीसिंग मरत असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र त्याचा मृतदेह न दाखवल्याने प्रेक्षकांना या मालिकेचा दुसरा भाग येणार याचा अंदाज आला. दुसऱ्या भागात अजितकुमार राजस्थानमधून नटवरलाल बनून गावात आल्याचं दाखवण्यात आलं. पुन्हा एकदा नटवरचा तोच खेळ सुरू झाला. ज्यामध्ये त्याने पुन्हा महिलांचे खून केले.

पहिल्या भागात इन्स्पेक्टर दिव्या सिंगकडून देवमाणसाचा खेळ खल्लास होईल असे वाटत होते. पण दिव्याला काही त्याने थांगपत्ता लागू दिला नाही. पण दुसऱ्या भागात इन्स्पेक्टर जामकरच्या जाळ्यात तो अडकला. त्यात डिंपलशी डॉक्टरचं लग्न झाल्यानंतर तिलाही त्याचे वागणं असह्य झाले. आई होणार असलेल्या डिंपलने डॉक्टरच्या विरोधात साक्ष दिली आणि अखेर डॉक्टरला फाशी झाली. केस आणि दाढी वाढलेले फोटो पाहून आता देवमाणूस मालिकेचा तिसरा भाग येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मालिकेच्या निर्माती श्वेता शिंदे हिने याबाबत काहीच जाहीर केलेले नाही किंवा कलाकारांकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. जर देवमाणूस मालिकेचा तिसरा भाग आला तर फाशी दिलेला डॉ अजितकुमार उर्फ नटवर कसा परत येणार हा प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनात डोकावत आहे. 

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाश्वेता शिंदेकिरण गायकवाड