Join us

तुला पाहते रे या मालिकेचा असा होणार शेवट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 13:48 IST

तुला पाहते रे ही मालिका आता लवकरच संपणार असल्याने या मालिकेचा शेवट काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

ठळक मुद्देसत्य समजल्यावर विक्रांतला प्रचंड धक्का बसणार असून तो आत्महत्येचे पाऊल उचलणार आहे. आता विक्रांतचा खरंच यात मृत्यू होतो की विक्रांत ईशाची माफी मागतो आणि ईशा देखील मोठ्या मनाने त्याला माफ करते असा मालिकेचा गोड शेवट करण्यात येईल हे लवकरच कळेल. 

'तुला पाहते रे' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. सुरुवातीला साधी, सोज्वळ ईशा निमकर आणि सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. त्यानंतर या मालिकेत टर्न अँड ट्विस्ट आले. विक्रांत सरंजामेचे लग्न झालं असल्याचं ईशाला समजलं. त्यामुळे त्यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला. पण त्यानंतर त्यांचे लग्न झाले आणि ईशा हीच विक्रांतची पहिली बायको राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचं समोर आले. विक्रांतनेच राजनंदिनीला मारले होते अशा बऱ्याच गोष्टी मालिकेत घडताना पाहायला मिळाल्या. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

तुला पाहते रे ही मालिका आता लवकरच संपणार असल्याने या मालिकेचा शेवट काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ईशा विक्रांतला माफ करणार का असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. विक्रांतचा मालिकेत मृत्यू झाला असल्याचे दाखवण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

विक्रांतला ईशाच्या आई-बाबांकडून ईशाच राजनंदिनीचा पुर्नजन्म असल्याचे कळले आहे. आता हे सत्य समजल्यावर विक्रांतला प्रचंड धक्का बसणार असून तो आत्महत्येचे पाऊल उचलणार आहे. आता विक्रांतचा खरंच यात मृत्यू होतो की विक्रांत ईशाची माफी मागतो आणि ईशा देखील मोठ्या मनाने त्याला माफ करते असा मालिकेचा गोड शेवट करण्यात येईल हे लवकरच कळेल. 

मालिका सुरू झाली तेव्हाच मालिका जास्त भागांची नसणार असल्याचं बोललं गेलं होतं. त्यामुळे मालिकेची कथा तशीच रेखाटण्यात आली होती. आता मालिकेची कथा निर्णायक वळणावर येत अखेर येत्या २० जुलै रोजी समाप्त होईल असं समजतं आहे. मालिकेचा शेवटचा भाग २० जुलै रोजी प्रसारीत होईल आणि याच दिवशी विक्रांत-ईशाच्या कथेचा शेवट पहायला मिळेल. 

या मालिकेचे शूट पूर्ण झालं असून नुकतीच मालिकेच्या टीमची रॅप अप पार्टी पार पडली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसले. त्यात सुबोधने सर्व कलाकारांना व्यंगचित्र असलेल्या फ्रेम गिफ्ट म्हणून दिल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :तुला पाहते रेझी मराठी