Join us
Daily Top 2Weekly Top 5

'...यामुळेच मला भावते अनघा', 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 13:42 IST

'आई कुठे काय करते' या मालिकेतील अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली आहे. नुकतेच अश्विनीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर अनघाच्या भूमिकेबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अश्विनी महांगडेने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आयुष्यात खूप मोठा धडा शिकल्यानंतर माणूस असा शांत होत असावा. नमिता ताई आणि मुग्धा ताई ने रेखाटलेली ही एक उत्तम व्यक्तिरेखा. मी साकार करतेय म्हणून उत्तम अजिबात नाही. पण "अनघा" उभी करताना या दोघी लाखो विचारांचा मध्य कसा असावा यावर कितीतरी वेळा बोलल्या असतील न. या वयातील लाखो मुलींचे नेतृत्व करणारी ही अनघा. खरच या सगळ्या मुलींना किती प्रेरणा देत असेल.

ती पुढे म्हणाली की, मी अश्विनी म्हणून जेव्हा अनघाकडे पाहते तेव्हा अनघा शांत, संयमीच वाटते. माझ्या मनाच्या कोपऱ्यात किती दुःख साचलेय या पेक्षा आजूबाजूच्या माणसांचे दुःख समजून त्यांना बोलत करणारी ही पोरगी केवढी ठाम आहे याचा विचार करून मी पण शिकते तिच्याकडून. स्वतःचे दुःख कुरवाळत न बसता माफ करणारी माणसं फारच कमी आहेत पण त्यातलीच एक मला व्हायचंय हे शिकले मी तिच्याकडून. कशात आनंद मानायचा किंवा आनंदाची व्याख्या तिची तिने खूप वेगळी बनवली म्हणून अनघा मला भावते.

अश्विनी महांगडेने या मालिकेव्यतिरिक्त स्वराज्यरक्षक संभाजी, अस्मिता या मालिकेत काम केले आहे. तसेच टपाल आणि बॉईज या मराठी चित्रपटातही ती झळकली आहे. 

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिकास्वराज्य रक्षक संभाजी