Join us
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास बसणार नाही पण  काळ्या कपड्यांमुळे गुलजार यांनी ऑस्कर सोहळ्याला जाणे टाळले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:29 IST

गुलजार यांनी ऑस्कर सोहळ्याकडे चक्क पाठ फिरवली. त्यावेळी या सोहळ्यातील त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.

ठळक मुद्दे‘जय हो’ हे गाणे गुलजार यांनी लिहिले होते तर ए. आर. रहमान यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले होते.

22 फेबु्रवारी 2009 रोजी ऑस्करची घोषणा झाली आणि ‘स्लमडॉग मिलीनियर’ या सिनेमाने तब्बल 8 ऑस्कर जिंकले. बेस्ट सिनेमा, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट स्क्रिनप्ले सोबत अनेक पुरस्कारांवर या सिनेमाने नाव कोरले. भारतीय संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत संगीतकार ए.आर. रहमान यालाही या चित्रपटासाठी ऑस्कर मिळाला.‘स्लमडॉग मिलीनियर’मधील ‘जय हो’ या गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉन्गचा अवार्ड मिळाला. हा ऑस्कर अवार्ड रहमान आणि गुलजार यांना विभागून देण्यात आला होता. पण प्रत्यक्ष ऑस्कर स्वीकारण्यासाठी रहमान एकटाच पोहोचला. गुलजार यांनी ऑस्कर सोहळ्याकडे चक्क पाठ फिरवली. त्यावेळी या सोहळ्यातील त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.

गुलजार ऑस्करसोहळ्याला का गैरहजर राहिले? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. पुढे एकदा एका मुलाखतीत गुलजार यांना नेमका हाच प्रश्न करण्यात आला. तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर सर्वांना अवाक् करणारे होते. होय, ऑस्कर सोहळ्यात काळा कोट घालणे बंधनकारक आहे आणि माझ्याकडे फक्त पांढरेच कपडे होते. म्हणून मी ऑस्करसोहळ्याला गेलो नाही, असे त्यांनी सांगितले होते. ऑस्कर सोहळ्याआधी टेनिस खेळताना मला छोटा अपघात झाला होता. त्यामुळे अमेरिकेला जाणे शक्य नव्हते. कदाचित मी गेलोही असतो. पण पांढ-याऐवजी काळ्या रंगाचे कपडे घालणे माझ्या मनाला पटत नव्हते. त्यामुळे घरच्यांचा आग्रह मोडून मी ऑस्करला जाणे टाळले, असेही त्यांनी सांगितले होते.

पांढ-या रंगाचे आणि गुलजार यांचे जुने नाते आहे. यावरही गुलजार एकदा एका मुलाखतीत बोलले होते. मी कॉलेजच्या दिवसांपासून पांढ-या रंगाचे कपडे घालतोय. हा रंग मला आवडतो. आता पांढरे कपडे सोडून मी रंगीबेरंगी कपडे घालायला लागलो तर असे वाटेल जणू मी खोटा आहे. माझे मीच स्वत:ला खोटे सिद्ध केले तर मी ते कसे सहन करणार. मी जसा आहे, तसाच राहू इच्छितो. मी असाच आहे, पांढरा..., असे गुलजार म्हणाले होते.  ‘जय हो’ हे गाणे गुलजार यांनी लिहिले होते तर ए. आर. रहमान यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले होते. हे गाणे गायले होते ते सुखविंदर सिंग या गायकाने.ऑस्करच्या नियमानुसार, गाणे लिहिणा-याला अवार्ड मिळतो. या नियमानुसार, ‘जय हो’साठी गुलजार आणि रहमान यांना ऑस्कर मिळाले होते.

टॅग्स :गुलजारऑस्कर