Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ अली खान प्रकरणातील हल्लेखोराला बांगलादेश सोडण्याची वेळ का आली?; वडिलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:45 IST

सहा सात महिन्यापूर्वी माझा मुलगा भारतात गेला होता. इतक्या कमी काळात तो मोठ्या सेलिब्रिटीच्या घरात कसा घुसू शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नवी दिल्ली - माझा मुलगा निर्दोष असून तो हल्लेखोरासारखा दिसतो म्हणून त्याला अटक केली असा दावा सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणी पकडलेल्या शरीफ इस्लाम शहजादच्या वडिलांनी केला आहे. शरीफुल याचे वडील रुहूल अमीन यांनी मदतीसाठी बांगलादेश सरकारकडे याचना मागितली आहे. अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफवर लिलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. नुकतेच सैफला घरी सोडलं आहे. मात्र या हल्ल्यातील ज्या आरोपीला पोलिसांनी पकडले त्याच्या वडिलांनी हल्ला करणारा माझा मुलगा नव्हता असा दावा केला आहे.

रुहुल अमीन यांनी ANI शी बोलताना म्हटलंय की, मला काही युट्यूब चॅनेल्स आणि पत्रकारांचा फोन आल्यानंतर माझ्या मुलाला भारतात पकडलं हे कळलं. माझा मुलगा हल्लेखोरासारखा दिसतो म्हणून त्याला अटक केली. तो निर्दोष आहे. मी ३-४ दिवसांनी बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयात जाणार आहे. तिथे माझ्या मुलाच्या सुटकेसाठी विनंती करणार आहे. सहा सात महिन्यापूर्वी माझा मुलगा भारतात गेला होता. इतक्या कमी काळात तो मोठ्या सेलिब्रिटीच्या घरात कसा घुसू शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शरीफुलनं बांगलादेश का सोडला?

रुहुल अमीन यांनी त्यांच्या मुलाने बांगलादेश का सोडला याचे कारणही सांगितले. माझं कुटुंब खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीशी जोडले आहे. मागील वर्षी शेख हसीना पुन्हा सत्तेत आल्या तेव्हापासून आमचा छळ सुरू होता. माझा मुलगा खालिदा जिया यांचा कट्टर समर्थक आहे. त्यासाठी त्याचा अधिक मानसिक छळ करण्यात आला. त्यातूनच त्याने बांगलादेश सोडण्याचा निर्णय घेत भारतात जाण्याची योजना बनवली असं त्याच्या वडिलांनी सांगितले.

शरीफुलची एकच चूक झाली की तो बेकायदेशीरपणे भारतात शिरला. सैफ हल्ला प्रकरणी जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत त्यात आरोपीचे केस मोठे आहेत, माझा मुलाला कधीही मोठे केस ठेवायला आवडत नाही असा दावा करत रुहुल अमीन यांनी सैफवरील हल्ला करणारा माझा मुलगा नाही असा दावा केला. १६ जानेवारीला अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून एका व्यक्तीने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात सैफ जखमी झाला होता. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :सैफ अली खान बांगलादेशमुंबई पोलीस