Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कुणी येणारेय का आमची घरं चालवायला?', हिंदी सिनेमातील नोकराच्या भूमिकांवरून हिनवणाऱ्यांना प्रिया बेर्डेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 21:10 IST

मराठी कलाकारांना विविध गोष्टींवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रिया बेर्डे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतच्या अनधिकृत असलेल्या ऑफिसवर बीएमसीने कारवाई केली होती. ही कारवाई केल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी समर्थन दर्शवले तर कोणी विरोधही केला. त्यांच्या या गोष्टीवरून त्यांना ट्रोलही केले गेले. त्यावेळी मराठी कलाकार हिंदी चित्रपटात नोकराच्या भूमिका करतात असेही म्हटले होते. असे म्हणणाऱ्या लोकांना आता मराठी चित्रपटसृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. 

एका संकेतस्थळाच्या रिपोर्टनुसार, प्रिया बेर्डे म्हणाल्या होत्या की, मी आता जे इथे व्यक्त होणार आहे त्याने खरंच काही कुणाला फरक पडणार आहे का? माहीत नाही… मी जे लिहितेय ते कुणी नीट वाचणार आहे का? माहीत नाही… माझ्या या म्हणण्यावर खूप जण आपले मत उत्तम मांडतील किंवा खूप जण त्याला वेगळेच रंग देऊन ट्रोल करतील किंवा आता हिचं काय म्हणून तोंड वेंगाडतील.. ठीक आहे ते आता महत्वाचं नाही.

त्या पुढे म्हणाल्या होत्या की, तर सध्या जे सगळ्या बाजूंनी वातावरण तापले आहे ते नक्की आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? सतत सगळे एकमेकांना शाब्दिक थोबडवत असतात, सतत आम्ही किती हुशार तुम्ही किती मूर्ख, तुम्ही कसे चुकलात आम्ही किती बरोबर, तू माझी गाय मारलीस थांब आता मी तुझं वासरू मारतो… बरं हे सगळं चालू असताना मीडियाची जी काही धाव पळ, धक्का बुक्की, ढकलाढकली चालू असते ते वेगळंच, यात आमच्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या काही लोकांनी आपले मत व्यक्त केले, विरोध दर्शवला की आता त्यांच्या मागे लागलेत यांना कोण विचारतो , हिंदीमध्ये नोकराची, मित्राची कामे करणारे नटनट्या, नवीन स्कुटरचे फोटो टाकणारे, किंवा इथे अत्याचार झाले तेव्हा कुठे होते, तिथे अन्याय झाला तेव्हा कुठे होते असे बरेच काही तोंडसुख घेतात. हो रे बाबांनो तुमचे खरे आहे आम्ही खूप सामान्य कलाकार आहोत तुम्हा प्रेक्षकांना मायबाप मानणारे आम्ही कलाकार आहोत आणि हे मराठी कलाकारांवर पूर्वापार झालेले संस्कार आहेत, हो आम्ही केलीत नोकराची आणि मित्रांची कामे हिंदीत, पण आमच्या समोर भल्याभल्या हिंदी हिरोची अभिनय करताना हातभर फाटली आहे, नोकर न मित्राने सारख्या नगण्य भूमिका आपल्या मराठी नटांनी सऱ्हस करून ठेवल्यात, हो आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे फोटो टाकतो कारण ते आपल्या कष्टातून आलेल्या पैशातून असतात. 

मित्रांनो तुम्हाला असे वाटते का की प्रत्येक कलाकार श्रीमंत असतो? असा सवाल करत प्रिया बेर्डे म्हणाल्या की, तुम्हाला दिसताना खूप ग्लॅमर दिसते पण इथेही खूप कष्ट आहेत, त्यात इथे नशिबाचा भाग पण खूप जास्त आहे, खूप असुरक्षित वातावरण असते इथे, बॉलिवूड सारखे आमचे बजेट नसते कारण आमच्या सिनेमांना ना थिएटर मिळत नाहीत, ज्यांच्या कडे काम आहे त्यांच्याकडे आहे , काहीजण कित्येक महिने घरात बसून काढतायेत खूप वाईट स्थिती आहे आर्थिक व मानसिकदृष्ट्या फार कठीण काळ आहे, अशावेळी आपलेच मायबाप प्रेक्षक अत्यंत घाणेरड्या पद्धतीने जर बोलायला लागले तर काय करायचं? कुणी येणार आहे का आमची घरं चालवायला? काही कलाकार व्यक्त होताना थोडे ओव्हररिऍक्ट होत असतीलही पण म्हणून कुणालाही आयमायच्या भाषेत बोलायचे कारण नसते, गेल्या ६ महिन्यात तुम्ही टीव्हीवर आमचेच चित्रपट, मालिका बघून स्वतःचे मनोरंजन करत होतात हे विसरू नका, आमचं क्षेत्र नसते तर विचार करा या कठीण काळात काय केले असत तुम्ही? आम्ही तुम्हाला मायबाप समजतो तर तशी जाणीव तुम्ही पण ठेवावी ही नम्र विनंती.

विविध गोष्टींवरून सातत्याने मराठी कलाकारांना ट्रोल करणाऱ्यांना प्रिया बेर्डे यांनी चांगलेच सुनावले होते. 

टॅग्स :प्रिया बेर्डे