Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अरिजितसोबत जे घडलंय ते माझ्यासोबतही झालंय', सोनू निगमने सलमान खानवर केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 19:35 IST

अरिजित सिंगने सोशल मीडियावर एका गाण्यावरून सलमान खानला विरोध केला होता. त्यानंतर अरिजितला सलमानमुळे काम मिळत नाही, असे बोलले जात आहे. त्यानंतर नुकतेच सोनू निगमने म्युझिक इंडस्ट्रीतील बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर आता बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या नवीन व्लॉगमध्ये म्युझिक इंडस्ट्रीतील बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्याच्याबद्दल सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. सोनू निगमने आपल्या व्लॉगमध्ये स्पष्ट सांगितले आहे की आज तुम्ही सुशांत सिंग राजपूतचे नाव ऐकत आहात पण कोणतातरी संगीतकार किंवा म्युझिक कंपोझरदेखील आत्महत्या करू शकतो. तसेच त्याने अरिजित सिंगसोबत जे इंडस्ट्रीत झाले आहे ते माझ्यासोबतही झाले असल्याचा खुलासा केला.

सोनू निगमने व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, आज सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला आहे. एक अभिनेता मेला आहे. उद्या तुम्ही कोणत्या तरी सिंगरबद्दल असे ऐकाल. म्युझिक इंडस्ट्रीतही माफियांचा कब्जा आहे. खरेतर माझा मूड नव्हता कारण सुशांतच्या निधनानंतर संपूर्ण देश मेंटल व इमोशनल प्रेशरमध्ये आहे. दुःख होणे साहजिकच आहे एका तरूण व्यक्तीला जग सोडून जाताना पाहणे सोपे नाही. कुणी तरी निर्दयी असेल त्याला याचा फरक पडणार नाही.

पुढे सोनू म्हणाला की, आपल्या देशात सिनेइंडस्ट्रीपेक्षा खूप मोठा माफिया राज्य संगीत क्षेत्रात आहे. मी लकी होतो की कमी वयात इंडस्ट्रीत आलो आणि यातून बाहेर पडलो. पण इथे नवोदित लोकांना टिकणे खूप कठीण आहे. माझ्याशी नवोदित कलाकार बोलतात तेव्हा सांगतात की त्यांच्यासोबत निर्माते, दिग्दर्शक व कंपोझर काम करण्यासाठी तयार आहेत पण म्युझिक कंपनी सांगते की हा आमचा कलाकार नाही. सोनूने असे भेदभाव करणाऱ्या लोकांना सांगितले की मी समजतो तुम्ही मोठी लोक आहात. म्युझिक क्षेत्रात तुमचे राज्य आहे. पण असे करू नका. शाप खूप वाईट असतात.

मी कित्येक नवीन सिंगर्स, नवीन कंपोझर्स व गीतकारांच्या डोळ्यातील स्वप्ने पाहिलीत आणि पूर्ण न झाल्यामुळे त्यांची होणारी नाराजी पाहिली आहे. जर ते मेले तर तुमच्यावर प्रश्न उभे राहतील. सोनूने बोलताना अरिजित सिंगच्या बहाण्याने सलमान खानवर निशाणा साधला. म्हणाला की, म्युझिक इंडस्ट्रीत दोन कंपनीच्या हातात संपूर्ण प्रस्थ आहे. माझी गाणी कोणी दुसरा अभिनेता ठरवतो.तोच ज्याच्यावर हल्ली टिका होते आहे. तो सांगतो की याच्याकडून गाणी गाऊन घेऊ नका. त्याने अरिजितसोबतही तेच केले.

सलमान खान आणि अरिजित सिंगचा वाद

सलमान खानचा जेव्हा ‘वीर’ हा चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा अरिजित सिंगने ‘क्या सर, सुला दिया आपने..’ असे स्टेटमेंट दिले होते. हे ऐकून सलमानला खूपच संतापला होता. शिवाय सलमान खानचा ‘सुलतान’ चित्रपट जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा त्यात ‘जग घुमिया’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. ह्यात अरिजित सिंगने सुद्धा काही भाग गायलं होते. सलमान खान ह्या गाण्याला चित्रपटांत ठेवू इच्छित नव्हता. अरिजित सिंगने सोशल मीडियावर त्याने हे गाणे काढून टाकण्याबद्दल सलमान खानचा विरोध केला होता. असे म्हटले जाते की, आज अरिजितला सलमानमुळे काम मिळत नाहीय.

टॅग्स :सोनू निगमअरिजीत सिंहसलमान खानसुशांत सिंग रजपूत