सध्या सगळीकडेच लग्नाचे वारे वाहत आहेत. अशातच मोस्टली सेन म्हणून नावारुपाला आलेली युट्यूबर प्राजक्ता कोळीही तिच्या लग्नाचा बार उडवून देणार आहे. प्राजक्ता तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकतंच तिचा मेहेंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
मेहेंदी सोहळ्यात प्राजक्ताने तिचा होणारा नवरा आणि आईसोबत झिंगाट गाण्यावर ठुमके लावले. याचा व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत झिंगाट गाणं लागताच प्राजक्ताला डान्स करण्याचा मोह आवरता आला नसल्याचं दिसत आहे. मेहेंदी लागलेल्या हातानेच प्राजक्ता मनसोक्त डान्स करत आहे. प्राजक्तासोबत तिची आईदेखील झिंगाट गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
प्राजक्ता कॉलेजमध्ये असल्यापासूनच वृषांक खनालला डेट करत आहे. १३ वर्षांपासून दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, प्राजक्ता आणिव वृषांक २५ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईजवळील कर्जत येथे त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. प्राजक्ता आणि वृषांकचे कुटुंबीय आणि दोघांच्या मित्र परिवाराला आमंत्रण आहे.